
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या फानल अल्टिमेटमनंतर लगेचच इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्रे डागल्याने आखाती देशातील तणावात मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इराणला तात्काळ तडजोड करण्याचा आणि युद्ध टाळण्याचा इशारा दिला होता. मात्र या इशाऱ्यानंतर काही दिवसांतच इराणने गुरुवारी हा हल्ला केला. इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, इराणकडून डागलेली क्षेपणास्त्रे रोखण्यासाठी त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, अवघ्या तीन तासांच्या कालावधीत इराणने क्षेपणास्त्रे डागण्याची ही तिसरी वेळ होती.
या हल्ल्यानंतर उत्तर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे धोक्याचे सायरन वाजले. प्राथमिक अहवालांनुसार, या हल्ल्यात अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इराणला अत्यंत कठोर शब्दांत समज दिली होती. जर इराणने लवकरच करार केला नाही, तर त्यांना ‘अश्मयुगात’ परत ढकलले जाईल आणि अमेरिका त्यांच्यावर कठोर कारवाई करेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते. या युद्धाची ठिणगी 28 फेब्रुवारी रोजी पडली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणवर अचानक हल्ला केला होता. या निर्णायक हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. या मोहिमेला अमेरिकेने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ तर इस्रायलने ‘ऑपरेशन रोअरिंग लायन’ असे नाव दिले होते. खामेनी यांच्या मृत्यूनंतर दोन्ही बाजूंनी वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू असून संघर्षाची तीव्रता वाढतच आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इशारा दिला आहे की, पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर ‘अत्यंत गंभीर’ हल्ला केला जाईल. अमेरिका आपली लष्करी उद्दिष्ट्ये वेगाने साध्य करण्याच्या तयारीत आहे. जर विहित मुदतीत कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका इराणचे वीज प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल. दरम्यान, अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट सत्तापालट करणे नसून केवळ परिस्थिती बदलणे हे आहे, असेही ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले.



























































