
छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यात एका विचित्र घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंबिकापूरच्या भगवानपूर परिसरात एका व्यक्तीने आपल्याच मित्राची हत्या केली आणि त्याचा मृतदेह स्वतःच्या घरात पुरला. मात्र, या हत्येनंतर तब्बल सात दिवसांनी आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. यामागील कारण ऐकून पोलीसही थक्क झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 आणि 25 मार्चच्या रात्री घडली. 35 वर्षीय ब्रिजलाल अगरिया हा घटनेच्या रात्री आरोपी मिथलेश कुजूर याच्या घरी दारू पिऊन आला होता. ब्रिजलालने मिथलेशला सोबत दारू पिण्याचा आग्रह केला, मात्र नवरात्रीचे दिवस असल्याने मिथलेशने त्याला नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हाणामारीत मिथलेशचा मोबाईल फुटला. यामुळे संतापलेल्या मिथलेशने काठीने ब्रिजलालच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हत्येच्या घटनेनंतर घाबरलेल्या मिथलेशने आपली पत्नी राजकुमारी हिच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. दोघांनी घराच्या अंगणात आधीच खोदलेल्या एका खड्ड्यात ब्रिजलालचा मृतदेह पुरला आणि त्यावर प्लायवूड टाकून मातीने तो भाग बुजवून टाकला. पुरावा नष्ट केल्यानंतर हे दाम्पत्य घराला टाळे लावून नातेवाईकांकडे निघून गेले. मात्र, या काळात मिथलेशची मानसिक अवस्था बिघडली. त्याला स्वप्नात तसेच जागेपणीही मित्राचा भास होऊ लागला. मित्राचे भूत आपल्याला त्रास देत असून अंत्यविधीसाठी आग्रह धरत आहे, या भीतीने तो हादरून गेला.
अखेर मानसिक दबाव सहन न झाल्याने मंगळवारी रात्री मिथलेशने गांधीनगर पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घराच्या अंगणातून ब्रिजलालचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी याप्रकरणी पती-पत्नी दोघांनाही ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

























































