अवकाळीच्या तडाख्यात राज्यातील एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; सर्वाधिक नुकसान नाशिकमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा राज्यातल्या शेतकऱयांना मोठा तडाखा बसला आहे. अवकाळी पावसामुळे 1 लाख 22 हजारांहून अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः नाशिक (29 हजार 812 हेक्टर), अहिल्यानगर (23 हजार 633 हेक्टर), जळगाव (22 हजार 361 हेक्टर), धुळे (14 हजार 832 हेक्टर), बुलढाणा (8 हजार 507 हेक्टर) व छत्रपती संभाजीनगर (8 हजार 445 हेक्टर) आदी जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

शेतकरी आर्थिक संकटात

शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी व खतांचा खर्च वाया गेला आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे आणि  शेतकऱयांच्या अडचणी जाणून घेतल्या. या दौऱयादरम्यान त्यांनी गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले.

  • राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱयांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱयांना लवकरात लवकर मदत दिली जाईल.
  • दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री

सर्वाधिक नुकसान नाशिकमध्ये

शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला गुरुवारी सायंकाळी वादळी वारा व मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पावसाने झोडपले. शहरात ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले. शहरवासीयांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागले. तर ग्रामीण भागात रब्बीची काढणीला आलेली पिके, तसेच फळबागा, कांदा, भाजीपाला यांची शेतकऱयांच्या डोळ्यादेखत नासाडी झाली.

गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळीने मुक्काम ठोकला असून, कुठल्या ना कुठल्या भागाला त्याचा दणका बसत आहे. सिन्नरच्या वावी व जवळील गावांमध्ये दुपारी वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस झाला. येवला, मालेगाव, सटाणा येथेही दुपारी पावसाने हजेरी लावली. दिंडोरीत गारांसह वादळी पावसाने कहर केला. नाशिक शहरासह पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, आडगाव येथे सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी संकट कोसळले. मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने परिसर जलमय झाला.

कांदा, गहू, फळबागांना मोठा फटका

खरीपापाठोपाठ रब्बी हंगामावरही अवकाळीचा फेरा आल्याने जिल्ह्यातील बळीराजा मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे. मार्चपासून दुसऱयांदा अवकाळी पाऊस सुरू आहे. पहिल्या वेळी या तडाख्यातून वाचलेले पीक आताच्या पावसाने पुरते उद्ध्वस्त केले. काढणीला आलेला कांदा, गहू, मका तसेच भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष, पेरू, आंबा आदींचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. काढणी करून ठेवलेल्या कांद्यासह पिकांचीही हानी झाली आहे.

सप्तशृंग गडावर मुसळधार

सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आज गारांसह मुसळधार पाऊस पडला. यामुळे दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेकडो भाविकांचे काही वेळ हाल झाले.

दिंडोरीत नर्सरीचे नुकसान

दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे वादळामुळे प्राथमिक शाळेचे पत्रे उडाले, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. भाऊसाहेब शिंदे यांच्या रोपवाटिकेची शेडनेट जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले.