
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आखाती देशांना बसू लागला आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर आणि अमेरिकन कंपन्यांच्या इमारतींवर हल्ले चढवत आहेत. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने आता आपल्या आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला फटका पाकिस्तानला बसला असून युएईने पाकिस्तानकडे आपले 2 अब्ज डॉलर्सचे (जवळपास 16 हजार कोटी) कर्ज तातडीने परत मागितले आहे. त्यामुळे शाहबाज शरीफ सरकारची कोंडी झाली आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे सौदी अरेबिया आणि युएई सारख्या देशांच्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तसेच इराणकडून होणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले पाहता या देशांना आता स्वतःच्या अर्थव्यवस्थेची चिंता सतावत आहे. याच कारणास्तव युएईने पाकिस्तानला दिलेली कर्जाची रक्कम तातडीने वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तान या महिन्याच्या अखेरपर्यंत ही रक्कम युएईला परत करणार आहे. पाकिस्तानच्या ‘स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’मध्ये ही रक्कम सुरक्षित ठेव म्हणून ठेवण्यात आली होती. पाकिस्तान या कर्जावर दरवर्षी 6 टक्के व्याज देत होता. यापूर्वी युएई हे कर्ज दरवर्षी रोलोव्हर करत असे. मात्र, डिसेंबर 2025 पासून ही मुदतवाढ केवळ एक-दोन महिन्यांसाठीच देण्यात आली होती. याची अंतिम मुदत 17 एप्रिल रोजी संपत आहे. ‘द इकोनॉमिक्स टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, इराण आणि अमेरिका-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तानने तुर्की आणि इजिप्तसारख्या देशांशी चर्चाही केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी युद्धात मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले होते आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही याचे स्वागत केले होते. मात्र युएईची भूमिका वेगळी आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणची दादागिरी कायमची संपवावी असे युएईला वाटते. याउलट पाकिस्तान इराणला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने युएईने आता पाकिस्तानचीच आर्थिक कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या पाकिस्तानकडे 21 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा असल्याने युएईचे हे कर्ज फेडण्यास ते सक्षम आहेत. मात्र युएईने घेतलेल्या या पावित्र्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढली आहे. कारण येत्या काळात पाकिस्तानला पुन्हा आंतरराष्ट्रीय मदतीची गरज भासणार असून त्यांना पुन्हा एकदा आखाती देशांकडे भिकेचा कटोरा पसरावा लागू शकतो.


























































