
>> अनंत देशमुख
मराठी ललित निबंध हा अनेक वैशिष्टय़ पैलूंनी सिद्ध होणारा प्रकार आहे. तो पूर्ण ताकदीनिशी अभिव्यक्त करण्याची क्षमता एखाद्याच लेखकात असते. लेखकाचे वाचन जितके विस्तृत, मानवी जीवनाचे आणि निसर्ग परिसराचे त्याचे निरीक्षण जितके समृद्ध तितकी त्याच्या लेखनाला धार जास्त. लेखक प्रशांत डिंगणकर यांचे लेखन या प्रकारात मोडते. त्यांनी आजवर विविध प्रकारांत वैशिष्टय़पूर्ण लेखन केलं असलं तरी त्यांचा मूळचा पिंड हा कवीचा आहे. चिंतनगर्भता हा त्यांच्या ठिकाणचा स्थायिभाव ठिकठिकाणी प्रत्ययाला येतो. अलीकडचे त्यांचे ‘मनबाधा’ हे ललित लेखन त्याची साक्ष देते.
पुस्तकाच्या शीर्षकासाठी त्यांनी निवडलेला ‘मनबाधा’ हा शब्द मला विशेष भावला. मानवी मन हे कधीच शांत नसते. क्षणोक्षणी त्यावर तार्किकतेपलीकडील भाव आणि स्मृतितरंग उमटत असतात आणि परिणामतः मन सतत विकारवश होते. या विकारवशतेला डिंगणकर यांनी ‘बाधा’ हा उचित शब्द योजलेला आहे.
मानवी मन हा डिंगणकरांच्या लेखनाचा विषय आहे. संवेदनशील मनाच्या डिंगणकरांना पडलेले ‘प्रश्न’ आणि जीवनविषयक ‘तत्त्व’ याविषयीचे चिंतन हा त्यांच्या प्रस्तुत लेखनाचा विषय आहे. डिंगणकर यांच्या मनात जीव, जगत आणि जिवात्मा याविषयी मूलभूत आकर्षण आहे. रामकथेत आणि हरिकथेत ते अधिक रमते. राधा आणि कृष्ण यांच्या भावकथेत ते चिंब भिजते आणि त्यांच्या काही प्रश्नांशी ते झगडते.
‘मेंदूपासून हृदयापर्यंत जोडल्या गेलेल्या नसांचा पुंजका जर वेगळा करून पाहिला तर मानवी मनाच्या कंगोऱयांचा उलगडा होत जात असावा बहुधा, पण स्वतच्या देहाच्या चिंधडय़ा करून अशा पाहता येत नाहीत. शरीर आणि मन हे वास्तव झाले. या सगळ्यांचा अंतर्गत कोलाहल, घुसमट, वादळ यांत भिरभिरणारा मानवी मनाचा गोफ हा गुंता होऊ शकतो. तो ज्याचा त्यालाच सोडवावा लागतो. गोफाची गुंफण करताना गुंत्याचं भान नसेल तर सगळं गणित कोलमडतं. भान असेल तर कविता साकारते, प्रतिभा जन्म घेते, राधादेखील सापडते. अर्थात, सारंच फसवं असतं. याच मानवी मनाच्या कुठल्याशा कोपऱयात आठवणींचे वादळ दाटून आले की, कविता जन्म घेते म्हणे! ही कविता काय, ती प्रतिभा काय किंवा ती राधा काय… सगळ्याच फसव्या. कधीही न सापडणाऱया!’ या शब्दांमध्ये त्यांनी जणू आपल्या लेखन चिंतनाचे सारच सांगितले आहे.
‘प्रत्येकाच्या मनात एक राधा असते’ असे विधान ते करतात. तेव्हा नकळत ज्ञानेश्वरांच्या ‘अमृतानुभवा’तील ‘शिवशक्तीसमावेशन’ या प्रकरणाची आठवणही आपल्याला होते. डिंगणकरांच्या विवेकशील मनात विचारांचं असं तुंबळ युद्ध चाललेलं असतं. जन्म नि मृत्यूचं एक कुतूहल आणि कोडं त्यांना पडतं. मग त्यांच्या लेखनात स्मशानांचा अटळपणे उल्लेख येतो. जीवनविषयक चिंतन, अस्तित्वाचे नाना प्रश्न आणि त्यातून पाझरणारे त्यांचे ललितरम्य शब्दरूप वाचकाच्या मनावर गारूड करतं. डिंगणकरांची शब्दांवर विलक्षण हुकमत आहे. हे शब्द त्यांच्या मनातील आशयाला चिंतनगर्भ आणि काव्यात्मक रूप कसं देतात ते पुढील परिच्छेदावरून सहज लक्षात यावं. राधेसंबंधी विवेचन करताना डिंगणकर लिहितात-
‘ती’ आकाशाच्या पृष्ठभागावर वावरते आहे, असा माझा समज आहे. तसा माझा समज आहे की, ‘ती’ सागराच्या लाटा विंचरते आहे. वाळूच्या प्रत्येक कणामध्ये ‘ती’च्या पायांतील पैंजणांचे घुंगरू मिसळून ‘ती’ नाचते आहे. मी असा या दाही दिशांना तिचा शोध घेतो आहे. म्हणूनच मी पंचमहाभूते चाळून पाहिली. मी त्याला ‘चाळूनच’ असे का म्हटले हे वाचताना लक्षात येईल. माझ्या मनाची एकाग्रता आणि माझ्या जिद्दीची कसोटी लागावी असा हा क्षण आहे. मी पंचमहाभूतांतला प्रत्येक कण आणि कण कोळून प्यायलो असतो तर या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर मला राधा भेटल्याचा आनंद झाला असता, पण ती ताकद माझ्या शब्दसामर्थ्यात नसावी.’
डिंगणकरांचं हे लेखन कोणीतरी आपल्या मनावरून हळुवारपणे मोरपीस फिरवीत आहे असं वाटावं असं आहे. ‘मनबाधा’ हे पुस्तक एकदा आपण हातात घेतलं की, त्यातील धीरगंभीर व आकर्षक काव्यपूर्ण, प्रवाही निवेदन शैलीनं विषयविवेचनाकडे खेचले जातो. मग पंचमहाभूते, षड्रिपू यांची ही कोडी ते कशी सोडवतात हे पाहाण्याकडे आपले लक्ष वेधले जाते. कवी प्रशांत डिंगणकरांना लौकिक जीवन जगताना नानाविध प्रश्न पडतात आणि या प्रश्नांची उत्तरं ते अधिकतर गांभीर्याने तात्त्विक आणि तार्किक पातळीवर घेत राहतात. तिथंही ते राधाकृष्णाच्या रूपकाचा आश्रय घेतात.
डिंगणकरांच्या विदग्ध व्यक्तित्वाचा परिचय आपल्याला होत जातो आणि हळूहळू ते ललित लेखनाला वरच्या वैचारिक पातळीवर नेऊन ठेवतात असे वाटू लागते. अलीकडल्या काळात रग्गड ललित लेखन वाचायला मिळते, पण डिंगणकरांच्या लेखनाची खुमारी वेगळी आहे हे सहज कळते. म्हणूनच आजच्या काळातील ते ललित लेखन प्रकाराचा मानदंड मानता येते. ही या लेखनाची अस्सल कमाई आहे.
मनबाधा
लेखक – प्रशांत डिंगणकर
प्रकाशक – स्वामीराज प्रकाशन

























































