
भाजप सरकार कितीही आव आणत असले तरी मुंबईत गॅस सिलिंडरचा तुटवडा अद्यापही कायम आहे. तासन्तास उन्हात उभे राहूनही ग्राहकांना सिलिंडर मिळेनासा झाला आहे. याचा परिणाम आज चेंबूरमध्ये पाहायला मिळाला. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट शीव-पनवेल महामार्गच रोखून धरला. रहिवाशांनी भरउन्हात चक्का जाम आंदोलन केल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
इराण-अमेरिका, इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे हिंदुस्थानात गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागत आहेत. बुकिंग केल्यानंतर गॅस सिलिंडर सध्या 15 ते 20 दिवसांनंतरही उपलब्ध होत नाही. परिणामी, नागरिकांना गॅस सिलिंडर घेण्यासाठी गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. एवढेच काय, तर रांगेत तासन्तास ताटकळत उभे राहूनही गॅस मिळेनासा झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. चेंबूरमधील भक्ती भवन परिसरातील गॅस सिलिंडर वितरकाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सकाळी गॅस सिलिंडरसाठी मोठी रांग लागली होती. भरउन्हात रांगेत उभे राहिल्यानंतरही गॅस सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी थेट शीव-पनवेल मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली. याची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले व या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.


























































