
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीचा इथेनॉल केमिकल भरलेला टँकर जगबुडी नदीच्या पुलावर आज दुपारी पलटी झाला. यामुळे इथेनॉल केमिकल जगबुडी नदीत मिसळल्याने पर्यावरणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आजूबाजूच्या गावातील पाणीपुरवठा दूषित होण्याची भीती असल्याने नगरपरिषदेने तातडीने पाणीपुरवठा बंद केला आहे.
महाडहून लोटे एमआयडीसीकडे निघालेला हा टँकर पुलावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. अपघातानंतर इथेनॉल केमिकल मोठय़ा प्रमाणात सांडले आणि परिसरात तीव्र उग्र वास पसरला. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लोटे एमआयडीसीमधील तज्ञांची मदतही घेण्यात येत आहे.
काल सुरक्षेचा दावा, आज अपघात
लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने काल शुक्रवारी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत पंपनी सर्व सुरक्षा पाळत असल्याचा दावा केला होता; मात्र आज दुसऱयाच दिवशी या पंपनीचा इथेनॉल केमिकलचा टँकर पलटी झाल्याने सुरक्षेचा दावा पह्ल ठरला आहे.
सोमवारी आंदोलनाचा भडका उडणार
कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती तसेच परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक पंपनीत होणाऱया पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात कंपनीसमोर सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. आजच्या दुर्घटनेचे पडसाद या आंदोलनात उमटणार आहेत.

























































