
कधी ढगाळ तर कधी प्रचंड उष्णतेची लाट यामुळे शहापुरातील आंबा बागायतदारांना जबरदस्त फटका बसला आहे. ‘सनस्ट्रोक’ मुळे ७० टक्के बागांमध्ये फळझड झाली असून केलेला खर्च निघेल की नाही अशी अवस्था आहे. याबाबत बागायतदारांनी संताप व्यक्त केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या कृषी विभागाने बागांचे पंचनामे करून नुकसानभरपाईचा अहवाल पाठवला. मात्र हे कागदी घोडे सरकारी गठ्यात धूळ खात पडले असल्याने बागायतदारांनी संताप व्यक्त केला आहे.
शहापूर तालुक्यात उत्पादनक्षम आंबा पिकाचे क्षेत्र ५७६ हेक्टर आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आंबा बागांची निगा राखली असतानाही हवामानातील अचानक बदलामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण व डोंगराळ भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. फळगळ सुरू राहिल्यास उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून फळगळ कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी आंबा उत्पादक शेतकरी उमेश धानके यांनी केली आणि हातातोंडाशी आलेले फळ वातावरणाच्या लहरीपणामुळे वाया जात असून आमची मेहनत वाया जात असल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
कृषीशास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार शासनाला अहवाल पाठवला आहे. ७० टक्के नुकसान झाले असल्याचे शासनाला कळविले आहे.
रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी अधिकारी
यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता, त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल अशा अपेक्षा होती. मात्र ढगाळ हवामान आणि वाढती उष्णता यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. झाडावर लागलेली लहान-मोठी फळे गळून पडत आहेत. शासनाने याची दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी.
उमेश धानके, स्थानिक आंबा बागायतदार

























































