
निवडणुकीच्या कामासाठी उल्हासनगर विधानसभा मतदार क्षेत्रात बीएलओ या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या चार शिक्षकांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी या सर्व शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सामान्य प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विशाल कदम यांनी हा एफआयआर दाखल केल्याची माहिती सहाय्यक मतदार नोदणी अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.
महानगरपालिका क्षेत्रातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली. मॅपिंग करणे व अस्पष्ट छायाचित्राची पडताळणी करून स्पष्ट छायाचित्र प्राप्त करणे, दुबार मतदारांना वगळणे अशा कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र शिक्षक संतोष गोरडे, मोनिका नारंग (बीजी तिलक स्कूल), महेश बडेकर, अनिल पाटील यांनी कामामध्ये कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
केवळ 20 टक्के काम पूर्ण
या सर्व शिक्षकांनी दिलेल्या कामापैकी केवळ 20 टक्क्यांपेक्षा कमी एसआयआर मॅपिंग व अस्पष्ट छायाचित्रांची पडताळणी केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. दुबार मतदार वगळण्यातही त्यांनी चालढकल केली. त्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून अजून बरेच जण रडारवर असल्याचे गणेश शिंपी यांनी सांगितले.

























































