
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. केवळ बंगालमधील सरकारी कामे ठप्प व्हावीत, या उद्देशाने मुर्शिदाबाद जिल्ह्यातुन ५०० अधिकाऱ्यांना कामावरून हटवण्यात आले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी रविवारी केला.
मुर्शिदाबाद येथील जाहीर सभेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “एकाच जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांना हटवण्यामागे केवळ राजकारण आहे. बंगालच्या जनतेसाठी सुरू असलेली कामे थांबावीत आणि प्रशासनात अडथळे निर्माण व्हावेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.”
मुर्शिदाबाद आणि मालदा येथील अलीकडच्या काही घटनांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, काही विशिष्ट भागांना लक्ष्य केले जात आहे. बंगालची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि विकासकामांमध्ये खोडा घालण्यासाठीच हे जाणीवपूर्वक केले जात आहे. मात्र, अशा कारवायांनी तृणमूल काँग्रेस डगमगणार नाही आणि बंगालची जनता या अन्यायाचे उत्तर मतपेटीतून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
























































