
>> विनायक
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी सोप्या अहिराणी काव्यात, जीवनाचं तत्त्वज्ञानच मांडलं. ‘जीव देवानं धाडला’ या कवितेत त्या म्हणतात- ‘आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर! अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर!’ एकेका ‘श्वासा’ची महती बहिणाबाई सहजतेने सांगून जातात. आपण पहिला श्वास कधी घेतो ते आपल्याला आठवत नाही आणि शेवटचा कधी घेणार ते कळत नाही, असं हे ‘एका’ श्वासाचं अंतर. पहिल्या ते अखेरच्या श्वासापर्यंत आपण जो श्वासोच्छ्वास करतो याचंही गणित आहे. त्यामागेही अर्थातच विज्ञान दडलंय.
आपण श्वासोच्छ्वास इतक्या नकळत, प्रतीक्षित क्रियेने करतो की, त्याचं मोजमाप करण्याचं ध्यानात येत नाही. त्या फंदात फारसं कुणी पडत नाही. योगाभ्यासातील प्राणायाम, अनुलोम-विलोम अशा क्रिया श्वासाशी संबंधित आहेत. उत्तम आरोग्यासाठी श्वासावर लक्ष ठेवावं आणि तो नियंत्रित करावा या गोष्टी सहजी येत नाहीत. प्रयत्नपूर्वक शिकाव्या लागतात.
आपला श्वास हा वातावरणातल्या हवेवर अवलंबून असतो. केवळ माणूसच नव्हे तर पृथ्वीवरचे सर्वच भूचर आणि जलचर तसंच आकाशगामी पक्षी श्वासोच्छ्वास करतात हे सर्वांनाच ठाऊक असतं. प्रत्येक जैविक प्रजातीची श्वसनक्रिया वेगळ्या प्रकारे चालते. कारण प्रत्येकाची शरीररचना निराळी असते. आपण माणसं रोज सुमारे 11 हजार लिटर हवा श्वासाद्वारे फुप्फुसात घेतो आणि उत्सर्जित करतो. एका मिनिटाला निरोगी व्यक्ती साधारण 12 ते 20 वेळा श्वास घेते. दिवसभरात आपण 20 हजार वेळा श्वसनक्रिया करत राहातो. झोपेतही ती थांबत नाही, तसं झालं तर घुसमटायला होईल. दमा किंवा अस्थमा रुग्णांना अशा घुसमटीचा अनुभव येतोच.
यामध्ये नवजात बालकांचं, वयात आलेल्याचं आणि वृद्धांचं श्वसन निराळय़ा वेगाने चालतं. याशिवाय धावणे, खेळणे, शारीरिक कष्टाची कामं करणे अशा प्रसंगी श्वासोच्छ्वास वेगाने होतो हेसुद्धा आपण अनुभवतो. श्वासावर काही गोष्टींचा विपरीत परिणामही होतो. मानसिक ताणतणाव, फुप्फुसांचे आजार आणि प्रदूषण यामुळे श्वसनात अवरोध निर्माण होऊ लागतो. तणावाखाली असलेली माणसं नकळत उसासे टाकतात, ते यामुळेच.
पृथ्वीवरच्या वातावरणात सुमारे 78 टक्के नायट्रोजन आणि 21 टक्के ऑक्सिजन (प्राणवायू) असतो. श्वसनातील प्राणवायू आपल्या शरीराला ऊर्जा देणारं मंद ज्वलन घडवत असतो. श्वासातून आत गेलेली हवा आपल्या फुप्फुसांमध्ये भरते. फुप्फुसांमध्ये असलेली ‘वायुकोषांची’ (अस्विअलाय) रचना केवळ अद्भुत आहे. हे वायुकोष द्राक्षांच्या घडासारखे असतात. त्याभोवती अतिसूक्ष्म केशनलिकांचं जाळं असतं. निसर्गाने अत्यंत कलाकुसरीने केलेल्या शरीररचनेतला जीवनावश्यक भाग. हे वायुकोष बिघडले, काही कारणांनी घट्ट झाले किंवा त्यांची लवचिकता कमी झाली तर पुरेसा प्राणवायू रक्तात जात नाही आणि कार्बनडाऑक्साइडचं योग्य उत्सर्जनही होत नाही. अशा रुग्णांना ‘बायपॅप’ नावाच्या यंत्राचा वापर करून कृत्रिम श्वसन करावे लागते.
या वायुकोषांचं प्रमाण वयात आलेल्या व्यक्तीच्या फुप्फुसात सुमारे 300 ते 500 दशलक्ष म्हणजे 30 ते 50 कोटी असतं! साधारण 275 ते 790 यामध्ये ते व्यक्तीपरत्वे कमी-जास्त असू शकतं. ही रचना आपल्या श्वासोच्छ्वसाची आयुष्यभर ‘काळजी’ घेत असते.
योग्य तेवढा ऑक्सिजन रक्तात मिसळणे आणि नकोसा कार्बनडायॉक्साइड पुन्हा हवेत सोडणे या श्वासोच्छ्वासाच्या क्रियेत खंड पडून चालत नाही. हवेतला नायट्रोजनही श्वासाद्वारे आत जातोच, परंतु त्यातला केवळ ऑक्सिजन ‘पॅसिव्ह डिसफ्युजन’ पद्धतीने रक्तात शोषला जातो. तो रक्तातील हिमोग्लोबिनकडे गेल्याने लाल रक्तपेशी ताज्यातवान्या राहतात. ‘पॅसिव्ह डिसफ्युजन’मध्ये कमी दाबाचा (लो प्रेशर) ऑक्सिजन प्राणवायू जेव्हा फुप्फुसात स्वीकारला जातो. त्याच वेळी उच्च दाबाचा (हाय प्रेशर) कार्बनडाऑक्साइड बाहेर पडतो. नायट्रोजन रक्तात मिसळत नाही. मात्र तो ‘ऑन्टिऑक्सिडन्ट’ म्हणून शरीराला उपकारक ठरतो.
फुप्फुसातील वायुकोष (अस्विअलाय) हे ‘सूक्ष्मतम’ (मायक्रोस्कोपिक) फुगे किंवा ‘बलून’ असतात. माणूस जन्मल्यापासून त्यांचं आकुंचन-प्रसरणाचं कार्य अव्याहत सुरू असतं ते अखेरपर्यंत.
आजचं पृथ्वीवरचं प्राण्यांचं जीवन ज्यावर अवलंबून आहे त्याची निर्मिती सुमारे अडीच ते तीन अब्ज वर्षांपूर्वी झाली. वनस्पतींच्या फोटोसिन्थेसिस (हरित द्रव्य) प्रक्रियेतून त्याला चालना मिळाली, आजही वनस्पती दिवसा, म्हणजे सूर्यप्रकाशात हरित द्रव्याची निर्मिती करतात तेव्हा वातावरणातला कार्बनडाऑक्साइड शोषून घेऊन ऑक्सिजन पुन्हा हवेत सोडतात. त्यामुळेच पृथ्वीच्या वातावरणातल्या वाढत्या कार्बनचा धोका कमी करण्यासाठी झाडे लावणे आणि आहे ती वनश्री वाचवणे किती आवश्यक आहे ते लक्षात येईल.
आपल्याला जीवनावश्यक असलेला
ऑक्सिजन स्वतः ज्वलनशील (फ्लेमेबल) मात्र नाही, तर तो ज्वलनाला मदत करतो आणि पुन्हा वातावरणात जातो. त्यामुळे आपण घेत असलेल्या श्वासातला ऑक्सिजन प्राचीन काळातही कुणाच्या तरी श्वसनात आलेला असू शकतो! एका सासाचं तंतर हे (तंत्र) असं आहे!































































