
मेट्रो-9 (दहिसर पूर्व ते काशिगाव) आणि मेट्रो-2 बी (मंडाळे-डायमंड गार्डन, टप्पा 1) या दोन नव्या मार्गिकांचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वयंचलित जलद वाहतूक प्रणालीचे (पॉड टॅक्सी) भूमिपूजन आणि ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग ‘टनेल बोरिंग मशीन’ प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे. नव्या मेट्रो मार्गिका बुधवारपासून खुल्या केल्या जाणार आहेत.
मेट्रो मार्गिका-2 ए व मार्गिका-7 यांचे स्वतंत्र संचालन, तसेच मार्गिका-9 आणि मार्गिका-2 बी (टप्पा 1) सुरू होणे हा मुंबई मेट्रोच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.
मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यापासून बदल
एमएमआरडीएने बुधवार, 8 एप्रिलपासून मुंबई मेट्रोचे सुधारित वेळापत्रक लागू केले आहे. मेट्रो मार्गिका-2 ए आणि मार्गिका-7 आता स्वतंत्रपणे चालवण्यात येतील तर मार्गिका-7 आणि मार्गिका-9 एकत्रितपणे चालवण्यात येतील. त्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदरदरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे. तसेच ठाणे जिह्यातील पहिल्या मेट्रो सेवेमुळे हार्बर लाईन परिसरालाही ‘मेट्रो कनेक्टिव्हिटी’ मिळणार आहे.
लोकार्पणाचा मुहूर्त वारंवार केला होता रद्द
नव्या मेट्रो मार्गिकांचे काम पूर्ण झाल्यानंतर वेळेत प्रवासी सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा होती. मात्र विविध कारणांमुळे लोकार्पण वारंवार रद्द केले. अखेर मंगळवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मेट्रो-2 बीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन पाच महिने, तर मेट्रो-9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन अडीच महिने उलटले. राज्य सरकारने निवडणुकांमुळे वेळ न दिल्याने लोकार्पण लांबणीवर पडले होते. आधी 3 एप्रिलचा मुहूर्त जाहीर केला होता. त्यात बदल करून नंतर 6 एप्रिलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यातही आयत्या वेळी बदल करून 7 एप्रिलची नवी तारीख निश्चित करण्यात आली.


























































