
गिरगाव येथील मुंबई मराठी साहित्य संघात मराठी भाषा-साहित्य तसेच मराठी नाटकाच्या प्रचार-प्रसार झटणाऱ्या डॉ. राजाराम अमृत भालेराव उर्फ डॉ. बाळ भालेराव यांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात येणार आहे. अर्धपुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते 11 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता होईल. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाळ भालेराव यांचा अर्धपुतळा स्थापन करण्याची संकल्पना साकारणाऱ्या साहित्य संघाच्या माजी अध्यक्षा अचला जोशी यांची विशेष उपस्थिती असेल.
10 ते 12 एप्रिलदरम्यान संगीत नाटय़ महोत्सव
दादर-माटुंगा सांस्कृतिक पेंद्राच्या वतीने 10 ते 12 एप्रिल दरम्यान संगीत नाटय़ महोत्सवाचे आयोजन केले आहे. संस्थेच्या वा.वा. गोखले सभागृहात या नाटकांचे दररोज सायंकाळी 5.30 वाजता सादरीकरण होईल. 10 एप्रिल रोजी ‘संगीत शांतीब्रह्म’ हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित नाटक सादर होईल. 11 एप्रिलला ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ नाटक सादर होईल. 12 एप्रिल या दिवशी श्री विजयदुर्ग सांस्कृतिक मंडळ, फोंडा-गोवा निर्मित ‘संगीत कटय़ार काळजात घुसली’ या नाटकाने होईल. महोत्सवाच्या दैनंदिन प्रवेशिका पेंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
दानपत्र कादंबरीचे 13 एप्रिलला प्रकाशन
अभयकुमार कुलकर्णी यांच्या ‘दानपत्र’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा 13 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाटय मंदिरात होणार आहे. कादंबरीचे प्रकाशन कवी सौमित्र अर्थात अभिनेते किशोर कदम यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र लाखे, किरण येले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गिरगावच्या राजेंद्र प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
‘संघर्ष यात्रा सावित्री’चा सुवर्णमहोत्सवी प्रयोग
‘संघर्ष यात्रा सावित्री’ या नाटकाचा 50वा प्रयोग येत्या 8 एप्रिल रोजी रात्री 7.30 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृह येथे होणार आहे. हा आकृती थिएटर निर्मित, संकल्प थिएटर प्रकाशित एकपात्री नाटय़प्रयोग आहे. नाटकाचे लेखन-दिग्दर्शक संदेश गायकवाड असून संध्या पानस्कर यांची मुख्य भूमिका आहे. या सुवर्णमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी, नृत्यांगना मेघा घाडगे यांची प्रमुख उपस्थिती असेल.
डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
मुंबई ः कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 9 एप्रिल रोजी सायंकाळी 4.30 ते 6 या वेळेत साठे महाविद्यालय सभागृह, दीक्षित रोड, विलेपार्ले पूर्व येथे होईल. या वेळी साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, प्रा.डॉ. माधव राजवाडे यांची प्रमुख उपस्थिती तर अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र पाठक असतील. कार्यक्रमाचे आयोजन भरारी प्रकाशनच्या लता गुठे यांनी केले.





























































