मरिअम्मा शोभायात्रेवर समाजकंटकांकडून हल्ला, गोरेगावमध्ये दंगलखोरांच्या बेकायदा घरांवर पालिकेने चालवला बुलडोझर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोरेगावमध्ये रविवारी रात्री मरिअम्मा देवीच्या शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्या दंगलखोरांच्या बेकायदा घरांवर पालिकेने आज बुलडोझर चालवला. मात्र या कारवाईदरम्यान दोन गटांत प्रचंड राडा झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला.

गोरेगावच्या संतोषनगर परिसरात रविवारी रात्री मरिअम्मा देवीच्या  शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सायंकाळच्या सुमारास शोभायात्रा संतोषनगरमधील ज्योती बार आणि रेस्टॉरंटजवळ आली असता  दोन गटांत तुफान राडा झाला. या हाणामारीत अनेकजण जखमीदेखील झाले. मरिअम्मा शोभायात्रेवर काही समाजकंटकांनी दगडफेक करीत हल्ला केल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत रात्री उशिरा आठ जणांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. यानुसार केलेल्या चौकशीत दंगलखोर समाजकंटक राहात असलेल्या झोपडय़ा अनधिकृत असल्याचे समोर आले. पालिकेकडे या बेकायदा बांधकामांबाबत अनेक तक्रारीदेखील आल्या होत्या. त्यामुळे आज पालिकेने कडक पोलीस बंदोबस्तात बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली. यावेळी दोन्ही गट एकमेकांविरोधात पुन्हा उभे ठाकले. जोरदार घोषणाबाजी आणि बाचाबाची झाल्यामुळे वातावरणात प्रचंड तणाव निर्माण झाला. गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. तर पोलिसांनीच दंगल भडकवल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे.

अमली पदार्थांच्या वादातूनच वाद सुनील प्रभू

संबंधित घटना ड्रगसारख्या अमली पदार्थाच्या वादातून झाल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. त्यांनी आज या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीची विचारपूसही ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जाऊन केली. या भागात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या वापराबाबत वारंवार आवाज उठवण्यात आला. विधानसभेतही अमली पदार्थांचा मुद्दा सरकारच्या निदर्शनास आणून देण्यात आला. मात्र कारवाई झाली नाही. पोलिसांनी आधीच ही कारवाई केली असती तर असा प्रकार घडला नसता, असे ते म्हणाले.

गाणं वाजवल्यावरून वादाची ठिणगी

मरिअम्मा देवीच्या शोभायात्रेदरम्यान प्रभू श्रीरामांचे गाणे लावण्यास एका गटाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे वादाची ठिणगी पडली. दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. शोभायात्रेतील स्पीकरही यावेळी तोडण्यात आले. यामध्ये बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते जखमीही झाले. तर शोभायात्रेवर हल्ला झालेल्या ठिकाणी हनुमान चालिसा म्हणण्याची मागणीही करण्यात आली. मात्र पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारल्याने आज पुन्हा वाद निर्माण झाला.