संगमेश्वरमधील सोनवी नदी प्रदूषणाच्या विळख्यात, दुर्गंधीमुळे ग्रामस्थ त्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील सोनवी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वाशी खोऱ्यातून वाहणारी ही नदी बुरंबी, सोनवडे, लोवले आदी गावांसाठी जीवनदायिनी मानली जात होती. मात्र सध्या तिची अवस्था चिंताजनक बनली आहे.

नदीकाठावर वाढलेली झाडाझुडपे, पाण्यात वाढलेले शेवाळ आणि साचलेला कचरा यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. अनेक ठिकाणी प्लास्टिक पिशव्या, घरगुती कचरा तसेच प्राण्यांचे अवशेष नदीत टाकले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीकडून नदीत पंप लावून पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. बांधकामासाठी या पाण्याचा वापर करताना खारे पाणी मिसळले जात असल्याने नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गाळ उपशाच्या नावाखाली नदीपात्रात खोल खड्डे खणले जात असल्याने नदीत पोहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी धोका वाढला आहे. यापूर्वी अशाच प्रकारामुळे बुडून मृत्यूची घटना घडल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नदी स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामांवर नियंत्रण ठेवावे, अशी ठोस मागणी केली आहे. सोनवी नदीचे अस्तित्व वाचवण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.