
जयपूरमध्ये परदेशी महिला पर्यटकासोबत छेडछाडीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आमेर परिसरातील जयगड किल्ल्याजवळ रविवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जपानमधून आलेली ही महिला दोन-तीन दिवसांपूर्वी राजस्थान पर्यटनासाठी आली होती. ती जयगड किल्ल्याजवळील गणेश मंदिराकडे जात असताना सुनसान भागाचा फायदा घेत पाच तरुणांनी तिला अडवले आणि तिच्यासोबत छेडछाड केली. या वेळी महिलेने धैर्य दाखवत मोठ्याने आरडाओरड केली आणि तेथून कसाबसा पळ काढत जवळच असलेल्या सुरक्षारक्षकांपर्यंत पोहोचली. तिची घाबरलेली अवस्था पाहून सुरक्षारक्षकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत सर्व आरोपी पसार झाले होते. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून त्यामध्ये पाच संशयित तरुण डोंगरावरून खाली उतरताना दिसत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिस स्थानिक गुन्हेगारी नोंदी तसेच पर्यटक मार्गदर्शकांशी संबंधित माहितीही तपासत आहेत.
या प्रकरणामुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.



























































