Ratnagiri News – देवरुख पोलिसांची धडक कामगिरी; आंबा घाटातील दरोडेखोरांना अवघ्या दोन तासांत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devrukh news

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरील दख्खन ते आंबा घाट दरम्यान गाडी अडवून, चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करून २५ हजार रुपये लुटणाऱ्या टोळीचा देवरुख पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना जेरबंद केले असून, फरार असलेल्या तीन जणांचा कसून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहूवाडी, कोल्हापूर) हे आपल्या बोलेरो गाडीतून वेतोशी (रत्नागिरी) येथून एक म्हैस भरून शिराळा (सांगली) येथे जात होते. सायंकाळी ६:३० च्या सुमारास आंबा घाट, दख्खन येथे आले असता, पाठीमागून आलेल्या दोन गाड्यांनी (पांडुरंग लिहिलेली थार क्र. MH-08/2767 आणि ‘भारत सरकार’ स्टिकर असलेली इनोव्हा क्र. MH-08/2099) त्यांना अडवले.

या गाड्यांतून आलेल्या आठ अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला गाडीतून ओढून मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले आणि साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपाजवळ नेले. तेथे फिर्यादीला ५० हजार रुपयांची मागणी करत धमकावण्यात आले. अखेर त्यांच्या बोलेरो गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये हिसकावून घेत, “पोलिसांना सांगितले तर याद राख,” अशी धमकी देऊन आरोपींनी पोबारा केला.

पोलिसांची वेगवान कारवाई

फिर्यादीने साखरपा पोलीस दूरक्षेत्रात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवले. ९ एप्रिल २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना तात्काळ अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी: १) फरहान रशिद मुल्ला (वय ४२, रा. कोकण नगर, रत्नागिरी) २) प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप, रत्नागिरी) ३) सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर, रत्नागिरी) ४) धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबांव, रत्नागिरी) ५) भूषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिऱ्या, रत्नागिरी)

ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात शांताराम पेंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा चव्हाण यांचा समावेश होता.