तुम्ही अशा पद्धतीने बोलू शकत नाही; मुख्य निवडणूक आयुक्तांशी भर बैठकीत IAS अधिकाऱ्याचा वाद; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि वरिष्ठ निवडणूक निरीक्षक अनुराग यादव यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. या वादानंतर अनुराग यादव यांना तातडीने निवडणूक निरीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या एका व्हर्च्युअल बैठकीदरम्यान हा प्रकार घडला. पश्चिम बंगालमधील कूचबिहार दक्षिणचे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त असलेले अनुराग यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या एका टिप्पणीवर तीव्र आक्षेप घेतला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी यादव यांना ‘घरी परत जा’, असे सुनावले, तेव्हा वातावरण अधिकच तापले. यावर संताप व्यक्त करत यादव यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना सुनावले की, “तुम्ही आमच्याशी अशा प्रकारे वागू शकत नाही. आम्ही २५ वर्षे सेवा बजावली आहे, तुम्ही असे बोलू शकत नाही.” अनुराग यादव हे उत्तर प्रदेश सरकारमध्ये प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी आहेत. या वादामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत यादव यांना त्यांच्या मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या संख्येबद्दल मूलभूत प्रश्न विचारण्यात आले होते, परंतु ते अचूक माहिती देऊ शकले नाहीत. त्यांच्या याच त्रुटीवर ज्ञानेश कुमार यांनी टीका केली होती. आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “निरीक्षक हे आयोगाचे डोळे आणि कान असतात. एखादा अधिकारी अनेक दिवस प्रत्यक्ष जागेवर राहूनही मतदान केंद्रांच्या संख्येसारखी मूलभूत माहिती देऊ शकत नसेल, तर प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न उभे राहतात.”

याच बैठकीत कूचबिहारमधील संवेदनशील मतदान केंद्रांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी अशा भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याची शक्यता वर्तवली. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर किमान सुविधा सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांशी वाद घातल्याप्रकरण आता अनुराग यादव यांना निवडणूक निरीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे.