
बिहारमधील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि आर्थिक स्थितीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिहार सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असून, लोकप्रतिनिधींनाही अद्याप पगार मिळालेला नाही, असा खळबळजनक दावा तेजस्वी यादव यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केला.
तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील संपूर्ण सरकारी यंत्रणा आता चौपट झाली आहे. सरकारचे लक्ष केवळ सत्ता टिकवण्यावर असून तिजोरीत खडखडाट आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार होत नाहीत, औषधे उपलब्ध नाहीत आणि रुग्ण स्ट्रेचरवर पडून आहेत. अररिया जिल्ह्यात दिवसाढवळ्या एका व्यक्तीचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “प्रशासन कुठे आहे? कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
एनडीएतील नेत्यांच्या मनात सध्या फक्त भाजपचा मुख्यमंत्री कोण होईल, हेच सुरू आहे. पूर्वी पाच वर्षांतून एकदा सरकार बनायचे, आता काही दिवसांतच नवीन सरकार पाहायला मिळते, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपकडे गृह मंत्रालय असतानाही बिहारमध्ये गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला.



























































