
मोबाईल फोनचा अचानक स्फोट झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याला दिल्ली जिल्हा ग्राहक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. या स्फोटामुळे विद्यार्थ्याला यूपीएससीची (UPSC) पूर्व परीक्षा देता आली नव्हती. याप्रकरणी आयोगाने ‘रियलमी’ (Realme) कंपनीला १.५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘पीटीआय’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युपीएससीचा विद्यार्थी कोती साई पवन याने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ४ जून २०२२ च्या मध्यरात्री त्याच्या रियलमी फोनचा अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत पवन गंभीर भाजला होता. जखमांमुळे त्याला अत्यंत महत्त्वाची नागरी सेवा पूर्व परीक्षा (UPSC Prelims) मुकावी लागली. विद्यार्थ्याचे करिअर आणि शारीरिक इजा लक्षात घेऊन आयोगाचे अध्यक्ष दिव्य ज्योती जयपूरिया आणि सदस्य रश्मी बन्सल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
आपल्या आदेशात आयोगाने कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या उत्पादनावर ताशेरे ओढले आहेत. तक्रारदाराला खराब बॅटरी किंवा सदोष फोन देणे हा कंपनीचा मोठा निष्काळजीपणा असल्याचे आयोगाने म्हटले. या स्फोटामुळे मोठी जीवितहानी देखील होऊ शकली असती. उत्पादनाच्या गुणवत्तेशी तडजोड केल्याबद्दल आणि ग्राहकाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कंपनीला हा दंड आकारणे आवश्यक असल्याचे आयोगाने म्हटले आहे.




























































