Ratnagiri News – ८० वर्षांपूर्वीचा जुना पूल तोडल्याने गावांचा संपर्क तुटला, पर्यायी पायवाट अडचणीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील फुरूस पोयनार मार्गावरील सुमारे ८० वर्षांपूर्वी बांधलेला जुना पूल बांधकाम विभागाने नुकताच तोडला असून त्याठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्या दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या कामामुळे फळसोंडा परिसर आणि पोयनार गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

काही गावांचा संपर्क तुटल्याची ही गंभीर समस्या समोर आली आहे. पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ पायवाट स्वरूपात एक तात्पुरता मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. परंतु या मार्गावरून रिक्षा किंवा चारचाकी वाहने जाऊ शकत नसल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. परिणामी, ग्रामस्थांना दैनंदिन कामांसाठी पायीच प्रवास करावा लागत आहे. विशेषतः, शाळकरी मुलांना दररोज पायपीट करावी लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

आपत्कालीन परिस्थितीतही वाहनांची सोय नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्याचबरोबर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन पर्यायीं सुविधा उपलब्ध करून देणे हि प्रशासनाची जबाबदारी आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, त्वरित पर्यायी रस्त्याचे काम सुरू करून किमान रिक्षा व लहान वाहनांसाठी योग्य मार्ग उपलब्ध करून द्यावा. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.