
स्वच्छ मुंबई प्रबोधन अर्थात दत्तक वस्ती अभियानात काम करणाऱ्या कामगारांना केवळ सहा हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्यामुळे या कामगारांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे दत्तक वस्ती योजनेतील कामगारांचे वेतन केंद्रीय किमान वेतन कायद्यानुसार 30 हजार रुपये करावे आणि योजनेत आवश्यक बदल करावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेविका मीनाक्षी पाटणकर यांनी ठरावाची सूचना मांडली असून घनकचरा प्रमुख अभियंत्यांना पत्रही दिले आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागातील स्वच्छतेसाठी दत्तक वस्ती योजना पालिकेने सुरू केली. या योजनेनुसार 2013 पूर्वी एक हजार माणसांमागे एक कामगार असे प्रमाण होते. या योजनेत सद्यस्थितीत प्रत्येक वॉर्डमध्ये 6 ते 7 संस्था काम करीत आहेत. या योजनेतील कामगार घरोघरी कचरा गोळा करणे, वर्गीकरण करणे, नियोजित स्थळी वाहनात रिकामा करणे, गटारांची सफाई आदी कामे करतात. हे काम करताना स्वतःच्या जीवालाही धोका असताना मुंबईकरांसाठी ते काम करतात. असे असताना त्यांना तुटपुंज्या वेतनामुळे घर चालवणे, मुलांचे शिक्षणाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे दत्तक वस्ती योजनेत आवश्यक बदल करून योजनेतील कामगारांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी मीनाक्षी पाटणकर यांनी केली आहे.




























































