
दूषित पाणीपुरवठ्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले असून गेल्या तीन महिन्यांत गॅस्ट्रो आणि कावीळचे तब्बल 106 रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरूनच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत नागरिकांनी अनेकदा आवाज उठवूनही पालिका ढिम्म असल्याने स्मार्ट सिटीची टिमकी वाजवणाऱ्या सत्ताधारी आणि प्रशासनाला कधी जाग येणार, असा सवाल विचारला जात आहे.
उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली असतानाच कल्याण-डोंबिवलीकर साथीच्या आजाराने बेजार झाले आहेत. जानेवारी ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गॅस्ट्रोचे 91 तर कावीळचे 15 रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर टायफॉईडचे 13, डेंग्यूचे 30 आणि मलेरियाचे 22 रुग्ण आढळून आले आहेत. स्वाइन फ्लू, लेप्टो आणि चिकुनगुनियाची रुग्णसंख्या शून्य आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या आजाराची जास्त रुग्ण सापडतात. मात्र आता उन्हाळा सुरू असतानाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी आणि या रोगांचा फैलाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
काळजी घ्या
उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. उघड्यावरचे अन्नपदार्थ, शिळे अन्न खाणे टाळा. जेवणाच्या आधी आणि स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर हात धुवा. घरगुती अन्न खा. हलका आणि सहज पचणारा आहार घ्या. डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. वेळेवर उपचार घ्या अशी माहिती साथरोग अधिकारी डॉ. संदीप मुकणे यांनी दिली.
तर तातडीने दवाखाना गाठा
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा गॅस्ट्रोएन्टेरिटिस हा पाण्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे रुग्णाला ताप, पोटदुखी, उलट्या, जुलाब, भूक न लागणे, पाणी कमी झाल्यामुळे तोंड कोरडे पडणे अशी लक्षणे दिसून येतात. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास खबरदारी म्हणून तातडीने दवाखाना गाठा आणि योग्य उपचार घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.




























































