मातोश्रीशी प्रतारणा नाही, उभा चिरला तरी मी ठाकरेंसोबतच; अरविंद सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’ची हवा काढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेनेचे नेतृत्व करतात त्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे. मला उभा जरी चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा होणार नाही आणि उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, अशी डरकाळी फोडत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या बातम्यांमधील हवा काढून टाकली. ते दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

अरविंद सावंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 8 खासदार जाणार या माध्यमात आलेल्या बातमीचा मी कडाडून निषेध करतो. कालपर्यंत बाकीच्यांची नावे देत होतात आणि आज माझेही दिले. नशीब अनिल देसाई यांना वगळले. पत्रकारिता एवढी विकली गेलीय याचे हे उदाहरण आहे. खोट्या बातम्या कशा दिल्या जातात हे देशातील जनतेने लक्षात घेतले पाहिजे. मला अनिल देसाई यांनी ही बातमी पाठवली. माझे सगळे मोबाईल देतो… त्यात एकाचा जरी कॉल आला किंवा मी बोलले हे सिद्ध झाले तर देईल ती शिक्षा घेईल.

उद्धव ठाकरे यांनी एका कॉलवर सांगितले मंत्रि‍पदाचा राजीनामा दे आणि मी दिला. ही समोर जी मूर्ती दिसतेय ती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली आहे. मोठ्या साहेबांनी आमदार केले, उद्धव साहेबांनी खासदार केले. त्यांच्याशी प्रतारणा करणे म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणे आहे. असले घाणेरडे संस्कार, विचार बाळासाहेबांचे नाहीत, असेही सावंत म्हणाले.

आज मला राजाभाऊ वाजे यांचा फोन आला… ओमराजे निंबाळकर यांचा फोन आला. संजय दिना पाटील यांच्याशीही बोललो. ओमराजे संतापले होते. वाजे म्हणाले, मी कुठे गेलो नाही आणि मला कुणाचा फोनही आला नाही. इतक्या धादांत खोट्या बातम्या ‘मुंबई मिरर’ सारख्या वर्तमानपत्राने छापली. त्यांच्यावर मी निश्चितपणे कायदेशीर कारवाई करणार असून बदनामीचा खटला टाकणार आहे. आमच्या चारित्र्यावर शिंतोडे टाकण्याचा हा प्रकार आहे. आम्ही आयुष्यभर निष्ठावंत राहिलो आहोत आणि मरेपर्यंत राहू. भगवा घेऊन आलो आणि भगवा पांघरून जाऊ, असे अरविंद सावंत म्हणाले.

24 एप्रिल रोजी शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जात आहेत. पण ही विकली जाणारी औलाद नाही. इतिहासात कान्होजी जेधे यांचे उदाहरण दिले जाते. अफजलखानाची स्वारी आल्यावर स्वत:च्या घरादारावर त्यांनी पाणी सोडले, ती औलाद इथे तुमच्या समोर बसली आहे. जगू तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू सुद्धा शिवसेनेबरोबरच, असेही अरविंद सावंत म्हणाले.