
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेकडे जगाचे लक्ष लागले असताना, इस्रायलने पाकिस्तानच्या भूमिकेबाबत उघडपणे अविश्वास व्यक्त केला आहे. हिंदुस्थानातील इस्रायलचे राजदूत रेवेन अझार यांनी पाकिस्तान केवळ व्यवस्थात्मक सहाय्य (Logistic Help) असल्याचे सांगत, इस्लामाबादवर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले.
एनडीटीव्हीशी बोलताना अझार म्हणाले की, “आम्हाला पाकिस्तानवर विश्वास नाही. अमेरिकाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाही. पाकिस्तानची भूमिका केवळ चर्चेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यापुरतीच मर्यादित आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, इस्रायलच्या अमेरिकेकडून अपेक्षा असून पुढील 2 आठवड्यांत अमेरिका या प्रक्रियेला स्थैर्याकडे नेईल, असा विश्वास आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात शुक्रवारी इस्लामाबादमध्ये प्रत्यक्ष चर्चेचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही देशांनी अलीकडेच 2 आठवड्यांच्या अटींसह युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या तहामुळे थेट चर्चेचा मार्ग मोकळा झाला असून मध्यपूर्वेत तणाव कमी करण्यासाठी या चर्चेला निर्णायक मानले जात आहे.
मात्र, फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार पाकिस्तान स्वतःला ‘शांततेचा दूत’ म्हणून सादर करत असला तरी प्रत्यक्षात अमेरिकेच्या दबावाखाली त्याने ही भूमिका स्वीकारली. अहवालात म्हटले आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढवत ते “तहासाठी विनवणी करत आहेत” असा दावा केला होता. याच काळात ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानमार्फत इराणला युद्धविरामासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला.
या प्रक्रियेत होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू ठेवण्यासाठी पाकिस्तानने इराणला पटवून देण्याची भूमिका बजावली, असे अहवालात नमूद आहे. त्यामुळे पाकिस्तान स्वतंत्र मध्यस्थ नसून अमेरिकेसाठी ‘सोयीस्कर माध्यम’ (convenient channel) म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, लेबनॉनवरील इस्रायलच्या कारवायांबाबत पाकिस्तानने केलेल्या निषेधावर प्रतिक्रिया देताना अझार यांनी ठाम भूमिका घेतली. इस्रायल आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही अझार यांनी गाझामध्ये पाकिस्तानच्या लष्कराच्या संभाव्य सहभागाला विरोध दर्शवला होता. तसेच हमास आणि पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांच्यात वाढत्या संबंधांबाबत इस्रायलने गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, इराणने इस्रायलवर गंभीर आरोप करत अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविरामाला धोका निर्माण केल्याचे म्हटले आहे. लेबनॉनवरील हल्ले सुरू राहिल्यास हा तह कोसळू शकतो आणि पुन्हा एकदा मध्यपूर्वेत तणाव वाढू शकतो, असा इशारा इराणने दिला आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतही परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तथापि, अमेरिका आणि इस्रायलने स्पष्ट केले आहे की लेबनॉन हा सध्याच्या युद्धविराम कराराचा भाग नाही. त्यामुळे एकीकडे शांतता चर्चेची प्रक्रिया सुरू असली तरी दुसरीकडे लष्करी तणाव कायम असल्याचे चित्र आहे.




























































