
गेल्या काही काळापासून देशाभरात कोयता गॅंग, बनियान गॅंग अशा अनेक टोळ्यांनी हैदोस घातला आहे. या बाबत अनेक बातम्या आल्या असताना आता आणखी एक गॅंग चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जनपदमध्ये एका ‘थप्पड गँग’ने धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या टोळीचा कोणताही ठोस उद्देश नसून केवळ दहशत निर्माण करण्यासाठी ते अशा प्रकारच्या घटना घडवत असल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही थप्पड गॅंग रात्रीच्या वेळी दुचाकीवरून येते आणि रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या पाठीमागून येऊन त्यांना जोरात कानशिलात किंवा बेल्ट मारून पसार होते. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 7 एप्रिल रोजी मुझफ्फरनगरमधील गोशाला भागात एक घटना घडली. दीपक नावाचा तरुण मंदिरातून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन-तीन तरुणांनी त्याच्या कानशिलात इतक्या जोरात लगावली की त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले. हा सर्व थरार जवळच असलेल्या एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून पीडित तरुणाने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही या टोळीने अनेकांना विनाकारण मारहाण केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच या ‘थप्पड गँग’च्या मुसक्या आवळल्या जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिले असून परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.


























































