वेब न्यूज : आंटी म्हटले – कोर्टात खटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
court

> स्पायडरमॅन

लंडनमध्ये नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका सहकर्मचारी महिलेला आंटी म्हटल्यामुळे एका तरुणाला कोर्टाने दंड केला, अशी बातमी वेगाने व्हायरल झाली. मात्र या घटनेमागील वास्तव थोडे अधिक वेगळे आणि विचार करण्यास भाग पाडणारे आहे. घटना National Health Service (NHS) मध्ये घडली. एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेने आपल्या सहकाऱयाविरुद्ध तक्रार केली की, तो तिला वारंवार आंटी म्हणत होता. त्या महिलेला हे संबोधन अपमानास्पद वाटत होते आणि तिने अनेक वेळा त्याला तसे न म्हणण्यास सांगितले होते तरीही हा प्रकार सुरू राहिल्याने प्रकरण कर्मचारी लवादामध्ये गेले.

न्यायालयाने स्पष्ट केले की, आंटी हा शब्द स्वतःमध्ये गुन्हा नाही, पण एखाद्याच्या इच्छेविरुद्ध सतत वापरल्यास तो छळ (harassment) ठरतो. येथे intent (उद्देश) पेक्षा impact (परिणाम) अधिक महत्त्वाचा ठरला. संबंधित महिलेला नुकसानभरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाची आणखी एक बाजू म्हणजे कार्यस्थळी असलेले कडक नियम. ब्रिटनसारख्या देशांमध्ये कामाच्या ठिकाणी असलेले समानतेचे कायदे खूप काटेकोर असतात. वय, लिंग किंवा वंश यावर आधारित कोणतीही टिप्पणी संवेदनशील मानली जाते. त्यामुळे अगदी साधा वाटणारा शब्दही कायदेशीर वादाचे कारण ठरू शकतो.

सोशल मीडियावर मात्र ही घटना अतिशय सोप्या आणि चुकीच्या पद्धतीने मांडली गेली. एकदा आंटी म्हटल्यावर दंड असा गैरसमज पसरला. प्रत्यक्षात हा प्रश्न एका शब्दाचा नसून कामाच्या ठिकाणी आदर, संवाद आणि मर्यादा यांचा आहे. सदर तरुणाने हा शब्द सतत वापरला होता आणि त्या शब्दाचे तिला वावडे आहे हे स्पष्ट सांगूनही तो थांबला नाही. या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो की, जागतिक वातावरणात काम करताना केवळ भाषेची नाही, तर संस्कृतीचीही जाणीव असणे तितकेच गरजेचे आहे. एखाद्या शब्दामागचा हेतू चांगला असला तरी त्याचा परिणाम समोरच्यावर कसा होतो हेच शेवटी महत्त्वाचे ठरते.