आम्ही विकले जाणारे नाही, शिवसेना खासदारांनी ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे आठ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून बुधवारी रात्री ठाण्यात त्यांची गुप्त बैठक झाल्याचे खोडसाळ वृत्त एका दैनिकात छापून आले आहे. यामध्ये काही खासदारांची नावेही नमूद केल्याने आज राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, हे वृत्त शिवसेनेच्या खासदारांनी फेटाळून लावले. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदारांची भूमिका मांडली. ‘आम्ही विकले जाणारे नाही,’ अशा शब्दांत त्यांनी खोडसाळ वृत्त पसवणाऱ्यांना ठणकावले. खोटी बातमी देणाऱ्या दैनिकाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार, असे त्यांनी सांगितले. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही, ‘मी कुणाच्याही संपर्कात नाही, मी आज आणि उद्याही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच राहणार,’ असे निक्षून सांगितले.

शिवसेनेचे आठ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार हे वृत्त पूर्णपणे खोटे व निराधार असल्याचे अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. त्याच्या आधी अशा बातम्या आणल्या जातात. यामागे विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं आहेत. मी स्वतः सहकारी खासदारांशी बोललो आहे. ज्यांनी खोडसाळ बातम्या दिल्या त्यांनी हिंमत असेल तर तिथे बैठकीला कोण गेले याचे फोटो छापून दाखवावेत, असे आव्हान अरविंद सावंत यांनी दिले.

कालपर्यंत माझ्या सहकाऱ्यांची नावं दिली जात होती. आज माझाही फोटो दिला. अनिल देसाई यांचं एकच नाव बातमीत वगळलं. या खोडसाळ बातमीचा आम्ही कडाडून निषेध करतो, असे सावंत म्हणाले.  देशातील जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे की खोटय़ा बातम्या पसरवल्या जात आहेत. एका जरी ठिकाणी शिंदे गटाकडून कुणाचा कॉल आला असेल अथवा मी त्यांच्याशी बोललो असेन तर जी शिक्षा द्याल ती मी भोगेन, असे अरविंद सावंत यांनी सांगितले.

मी कुणाच्या संपर्का नाही

ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, माझ्याशी कुणाचाही संपर्क नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही. मी आज आणि उद्याही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केले.

अब्रुनुकसानीचा दावा करणार

मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. मला उभा चिरला तरीमातोश्रीची निष्ठा संपणार नाही. मी शिवसेना पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे अशी खोटी बातमी छापली. त्याचा मी तीव्र निषेध करतो. हे माझ्या आयुष्यभराच्या निष्ठावंत वाटचालीवर त्यांनी बालंट लावले म्हणून त्यांच्या विरोधात मी अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात करणार असल्याचा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. शिवसेनेशी प्रतारणा म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा ठरेल, असे सांगताना जगेन तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत, मरेन तर भगव्या सोबतच, असे सावंत यांनी लिहूनच दिले.