
महायुती सरकारमधील बहुतांश मंत्री सरकारी बंगल्यावरून कारभार करीत आहेत. पण तरीही मंत्रालयाच्या इमारतीमधील जागा अपुरी पडू लागल्याने मंत्रालयाच्या शेजारीच नवीन अॅनेक्स 2 ही इमारत उभी राहात आहे. या इमारतीमध्ये दोन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांना दालने मिळतील. अॅनेक्स 2 च्या संपूर्ण पहिल्या मजल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाला (सीएमओ) सात हजार चौरस फुटांची जागा दिली आहे. मंत्रालयाच्या सध्याच्या इमारतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडे 9 हजार चौरस फूट जागा आहे. म्हणजे दोन्ही इमारतींमध्ये तब्बल सोळा हजार चौरस फूट जागा मुख्यमंत्री कार्यालयाला मिळेल.
100 दिवसांचे उद्दिष्ट अयशस्वी
सध्या अनेक शासकीय कार्यालये नरीमन पॉइंटपासून जीटी हॉस्पिटल येथील मिनी मंत्रालयात आहे. त्यामुळे सुमारे 110 कोटी रुपये खर्च करून गार्डन गेटजवळ नवीन पाच मजली अॅनेक्स इमारत बांधण्यात आली. वास्तविक ही इमारत प्री फॅब तंत्रज्ञानाने 100 दिवसांत पूर्ण करण्याचे मूळ उद्दिष्ट होते. पण कंत्राटदाराचे काम खूप संथगतीने सुरू आहे. आता 31 जुलैपर्यंत इमारती पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. पण कंत्राटदाराने 31 ऑगस्टपर्यंतची मुदत मागितली आहे. या तारखेपर्यंतही बांधकाम पूर्ण होईल याची शाश्वती नाही, तरीही अॅनेक्स 2 मधील कार्यालयांचे वाटप करून टाकले आहे. संबंधित विभागांना त्यांच्या सोयीनुसार दालनांची कामे करण्यासाठी वाटप झाल्याचे सांगण्यात येते.
राज्यमंत्र्यांना लहान दालने
नव्या इमारतीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर या दोन कॅबिनेट मंत्र्यांसह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक, योगेश कदम, माधुरी मिसाळ आणि मेघना दीपक बोर्डीकर-साकोरे यांना जागा मिळाली आहे. कॅबिनेट मंत्र्यांना 1600 ते 1700 चौरस फूट तर राज्यमंत्र्यांना 1400 ते 1500 चौरस फूट आकाराची जागा दिली आहे. मंत्र्यांच्या व्यतिरिक्त मंत्रालयाबाहेर असलेल्या वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांना नव्या इमारतीत जागा उपलब्ध झाली आहे. नव्या पाच मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर चार दालने याप्रमाणे 20 मंत्र्यांना आधुनिक आणि सुसज्ज दालने उपलब्ध करून देण्याची मूळ योजना होती. परंतु, सर्व दालने मंत्र्यांना देण्याऐवजी मुख्यमंत्री कार्यालय आणि इतर विभागांना जागा देण्याचा निर्णय झाला.


























































