
<<दुष्यंत पाटील>>
‘एज ऑफ एनलाईटनमेंट’च्या काळात उदयास आलेल्या ‘रोमँटिसिझम’चे प्रतीक ठरलेले कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक या चित्रकाराचं ‘द सी ऑफ आइस’ हे चित्र. सर विल्यम एडवर्ड पेरी हा ब्रिटिश नौदलातील अधिकारी विल्यम पेरीच्या सागरी मोहिमेची पार्श्वभूमी असलेले हे चित्रकलेच्या इतिहासातलं एक ‘मास्टरपीस’ मानले जाते.
रोमँटिसिझम म्हणजे ‘डोक्याकडून पुन्हा हृदयाकडे’ केलेला प्रवास होता. या काळातल्या लोकांना वाटायचं की, केवळ तर्क आणि गणित म्हणजे आयुष्य नाही. युरोपमध्ये सतरावं आणि अठरावं शतक हा काळ ‘एज ऑफ एनलाईटनमेंट’ या नावानं ओळखला जातो. याला आपण ‘डोळे उघडण्याचा काळ’ म्हणू शकतो. ‘एज ऑफ एनलाईटनमेंट’मधल्या विचारवंतांनी सांगितलं की, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, प्रत्येक गोष्ट स्वतचा तर्क वापरून तपासा. या काळात विज्ञानाची भरभराट झाली.
एनलाईटनमेंटच्या काळात निसर्गातली प्रत्येक गोष्ट कशी चालते ते आपल्याला समजू शकेल यावर त्यांचा विश्वास होता. या विचारांमुळेच माणसाला वाटलं की, आपण निसर्गाला ‘जिंकू’ शकतो. एनलाईटनमेंटने जगाला प्रगती दिली, पण त्यातूनच काही समस्याही निर्माण झाल्या. एनलाईटनमेंटच्या काळात प्रत्येक गोष्टीला तर्क आणि गणितानं मोजलं जायचं. या काळात निसर्गाचं नुकसान होऊ लागलं. 18 व्या शतकात इंग्लंड आणि युरोपमध्ये कारखाने सुरू झाले. शहरं प्रदूषित झाली, लोक गावाकडचा निसर्ग सोडून शहरातल्या काळपट चाळींमध्ये राहू लागले. माणसाचं आयुष्य यंत्रासारखं ‘नऊ-ते-पाच’ झालं. माणसाचं आयुष्य खूप ‘हिशोबी’ आणि ‘कोरडं’ झालं. भावनांचं महत्त्व कमी झालं. याच ‘हिशोबी’पणाला कंटाळून पुढे युरोपमध्ये रोमँटिसिझम नावाची एक लाट आली. ‘रोमँटिसिझम’मध्ये पुन्हा एकदा भावना, कविता आणि निसर्गाच्या गूढ सौंदर्याला महत्त्व दिलं.
रोमँटिसिझम म्हणजे ‘डोक्याकडून पुन्हा हृदयाकडे’ केलेला प्रवास होता. या काळातल्या लोकांना वाटायचं की, केवळ तर्क आणि गणित म्हणजे आयुष्य नाही. माणसाचं प्रेम, भीती, दुःख आणि त्याच्या मनातील गुंतागुंत जास्त महत्त्वाची आहे, असं या काळात मानलं गेलं. निसर्ग हे केवळ वापरण्याचं साधन नाही, तर तो एक गुरू आहे. शहरातल्या प्रदूषणापेक्षा डोंगर, नद्या आणि अथांग समुद्रात खरा आनंद मिळतो, असा विचार या काळात रुजला. रोमँटिसिझमच्या काळानं जगाला अनेक महान कलाकार दिले. या काळातल्या अनेक कवींनी, लेखकांनी, चित्रकारांनी आणि संगीतकारांनी आपापल्या पद्धतीनं रोमँटिसिझमचे विचार मांडले. कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक या चित्रकाराचं ‘द सी ऑफ आइस’ हे चित्र याच प्रकारचं होतं. या चित्राला विल्यम पेरीच्या सागरी मोहिमेची पार्श्वभूमी होती.
सर विल्यम एडवर्ड पेरी हा ब्रिटिश नौदलातला एक अत्यंत शिस्तबद्ध आणि हुशार अधिकारी होता. पेरी हा केवळ अनुभवी खलाशीच नव्हता, तर तो एक उत्तम नियोजक होता. पेरीने 1819 मध्ये ‘हॅक्ला’ आणि ‘ग्रिपर’ नावाच्या दोन जहाजांसह उत्तर ध्रुवाकडे प्रवास सुरू केला. त्याला युरोपमधून आशियात (विशेषत भारत आणि चीनमध्ये) येण्यासाठी अटलांटिक महासागरातून उत्तर ध्रुवाच्या बाजूने जाणारा ‘शॉर्टकट’ रस्ता शोधायचा होता. यामुळे प्रवासाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार होतं. तो कॅनडाच्या उत्तर भागात खूप लांबपर्यंत पोहोचला. इतक्या लांबपर्यंत त्याआधी कोणीही गेलं नव्हतं. या कामगिरीबद्दल त्याला ब्रिटिश सरकारकडून 5,000 पाऊंडचं बक्षीस मिळालं, पण त्याचं जहाज गोठलेल्या समुद्रात अडकलं. कित्येक महिने त्याला आणि त्याच्या टीमला अंधारात व हाडं गोठवणाऱया थंडीत बर्फात अडकून राहावं लागलं. सुदैवानं पेरीनं अतिशय कल्पकतेनं आपल्या माणसांना जिवंत परत आणलं.
कॅस्पर डेव्हिड फ्रेडरिक यानं जेव्हा ‘द सी ऑफ आइस’ काढलं, तेव्हा पेरीच्या या धाडसी मोहिमेच्या बातम्या संपूर्ण युरोपमध्ये गाजत होत्या. फ्रेडरिकनं पेरीच्या मोहिमेतील जहाजांच्या वर्णनावरून आणि अपघातांच्या बातम्यांवरून हे चित्र रेखाटलं. पेरी जरी जिवंत परत आला असला तरी फ्रेडरिकनं चित्रात ‘शोकांतिका’ दाखवली. (पेरीच्या मोहिमेनंतर इतर अनेक जहाजे तिथे अडकून फुटली होती. फ्रेडरिकने त्या सर्व घटनांचा संदर्भ घेऊन एक ‘काल्पनिक पण सत्य वाटणारी’ शोकांतिका रंगवली.) त्यानं असं दाखवलं की, निसर्गाच्या बर्फाळ जबडय़ात जहाज पूर्णपणे चिरडलं गेलंय.
चित्राच्या मध्यभागी बर्फाचे मोठे थर एकमेकांवर चढलेले दिसतात. हे एखाद्या जुन्या वाडय़ाच्या कोसळलेल्या भिंतींसारखे वाटतात. हे निसर्गाचं रौद्र रूप आहे. चित्रात आपल्याला एक जहाज पूर्णपणे चक्काचूर झालेलं दिसतं. चित्रात कुठेही माणसं नाहीत. चित्रातली भयाण शांतता खूप काही सांगून जाते. थोडक्यात सांगायचं तर हे चित्र म्हणजे ‘निसर्गाची ताकद अथांग आहे आणि माणसानं आपल्या मर्यादेत राहावं’ हे सांगणारं एक अजरामर दृश्य आहे.
जेव्हा हे चित्र लोकांसमोर आलं, तेव्हा अनेकांना ते आवडलं नाही. कारण पेरीच्या मोहिमेमुळे लोकांमध्ये एक प्रकारचा उत्साह होता, पण फ्रेडरिकनं या चित्रातून माणसाच्या पराभवाचं आणि मृत्यूचं भीषण दर्शन घडवलं होतं. पेरीची मोहीम ही माणसाच्या हिमतीचं प्रतीक होती, तर फ्रेडरिकचं चित्र हे ‘निसर्गाच्या अंतिम सत्तेचं’ प्रतीक होतं. सुरुवातीला लोकांना हे चित्र आवडलं नसलं तरी आजच्या काळात मात्र ‘द सी ऑफ आइस’ हे चित्र कलेच्या इतिहासातलं एक ‘मास्टरपीस’ मानलं जातं.





























































