
हिंदुस्थानातील महिलांना सोन्याबद्दल विशेष प्रेम आहे. देशातील घरांमध्ये आणि मंदिरात तब्बल 50 हजार टन सोने पडून आहे. याची किंमत जवळपास 10 ट्रिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 830 लाख कोटी रुपये इतकी आहे. तसेच जगातील सर्वात मोठय़ा 10 सेंट्रल बँकांच्या एकूण साठ्यापेक्षाही जास्त आहे, अशी माहिती द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे.
हिंदुस्थानात इतके सोने आहे की, अमेरिका आणि चीन वगळता जगातील जवळजवळ प्रत्येक देशाच्या वार्षिक ‘जीडीपी’पेक्षाही ते जास्त आहे. जर हे सोने देशाच्या बँकिंग प्रणालीत किंवा व्यवसायात गुंतवले गेले, तर हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा वेग अनेक पटींनी वाढू शकतो. हिंदुस्थानच्या अधिकृत सरकारी तिजोरीत 880.3 टन सोने आहे, जी जगात 8 व्या क्रमांकावर आहे. हे अमेरिकेच्या 8,133 टन सोन्याच्या तुलनेत खूप कमी आहे, पण खासगी साठ्यात हिंदुस्थान सर्वात पुढे आहे. कोटक इन्स्टिटय़ुशनल इक्विटीजच्या अंदाजानुसार, 2024 ते 2026 दरम्यान सोन्याच्या किमतींमध्ये देशातील घरांच्या संपत्तीला जबरदस्त चालना मिळाली आहे. जानेवारी 2026 पर्यंत घरांमध्ये असलेल्या सोन्याचे मूल्य 5 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. कुटुंबांकडे असलेल्या बँक ठेवी आणि शेअर बाजारात गुंतवलेल्या एकूण पैशांच्या तुलनेत सोन्याचे मूल्य 175 टक्क्यांहून अधिक आहे.
मध्यवर्ती बँकांचा सुवर्ण साठा
- अमेरिका – 8133.5 टन
- जर्मनी – 3351.5 टन
- इटली – 2451.8 टन
- फ्रान्स – 2436.9 टन
- रशिया – 2335.9 टन
- चीन – 2264.1 टन
- स्वित्झर्लंड – 1040 टन
- जपान – 846.0 टन
- हिंदुस्थान – 840.7 टन
- नेदरलँड – 612.5 टन
हिंदुस्थान हा जगातील सोन्याचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. देशात जून 2025 पर्यंत नाणी आणि बिस्किटांची मागणी 23.9 टक्क्यांवरून 32 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. 2047 पर्यंत हिंदुस्थानच्या जीडीपीमध्ये अतिरिक्त 7.5 ट्रिलियन डॉलरची भर पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत सोने आणि दागिन्यांच्या बदल्यात दिलेले गोल्ड लोन 24.43 लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे.


























































