
शनिवारची पहाट 30 सप्टेंबर 1993 च्या स्मृती घेऊनच आली! सकाळी 8.45 मिनिटांनी हिंगोली, नांदेड तसेच परभणी हे तीनही जिल्हे भूकंपाच्या जबर धक्क्याने हादरले. तब्बल 33 वर्षांनंतर म्हणजेच किल्लारीच्या महाप्रलयंकारी भूकंपानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 4.7 एवढी झाली असून केंद्रबिंदू हिंगोली जिल्हय़ात पांगरा शिंदे येथे असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. यापूर्वी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.
हिंगोली जिल्हय़ात सकाळी 8.45 वाजता अचानक भूगर्भातून मोठा गडगडाट झाला. अवघे काही सेपंद पृथ्वी पंपायमान झाली. काही कळण्याच्या आत अनेक घरांच्या खिडक्यांची तावदाने वाजली. दरवाजे धाडधाड आवाज करू लागले. हा भूकंप आहे याची जाणीव होताच लोकांची पळापळ सुरू झाली. अनेक जण साखरझोपेत होते. स्वयंपाकघराच्या फडताळातील सामानाचे डबे वाजू लागताच घाबरलेल्या महिला कच्चेबच्चे घेऊन घराबाहेर आल्या. काही सेपंदांचा हा भूकंपाचा धक्का जीव घाबरा करूनच थांबला. हिंगोलीसह कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव या पाचही तालुक्यांना भूकंपाचा धक्का बसला.
सेनगावला पहिल्यांदा धक्का
हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यात यापूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. परंतु, सेनगाव तालुक्यातील काही गावांना पहिल्यांदाच भूकंपाचा धक्का जाणवला.
परभणीत पूर्णा परिसराला हादरा
हिंगोली जिल्हय़ातील वसमत तालुक्याला खेटूनच असलेल्या परभणी जिल्हय़ातील पूर्णा तालुक्यासह अनेक गावांमध्ये सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. धक्का बसताच काही काळ घबराटीचे वातावरण होते.
नांदेड जिल्हय़ात गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे हादरे बसत आहेत. शनिवारी बसलेला धक्का सर्वात मोठा होता. अर्धापूर, मुदखेड, लोहा, नायगाव, हदगाव तसेच हिमायतनगर परिसराला हा हादरा बसला.
आपत्ती व्यवस्थापन पांगरा शिंदे गावात
भूकंपाचा पेंद्रबिंदू पांगरा शिंदे येथे असल्याचे कळताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापनाचे पथक तातडीने पांगरा शिंदेकडे रवाना केले. या पथकाने तडे गेलेल्या, पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. त्याचबरोबर भूकंपाचा धक्का जाणवल्यास काय केले पाहिजे याची माहितीही देण्यात आली.




























































