‘सह्याद्री एक्स्प्रेस’वर मध्यरात्री दरोडा, कराडजवळ शेणोलीत सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले; मिरज लोहमार्ग पोलिसांचा तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्स्प्रेसवर मध्यरात्री दरोडा पडल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यात उघडकीस आली आहे. कराडजवळ शेणोली रेल्वेस्टेशन परिसरात दरोडेखोरांनी रेल्वे सिग्नलमध्ये छेडछाड करून गाडी थांबवली आणि प्रवाशांना लक्ष्य करत सोने-चांदीचे दागिने, मोबाईल लुटले. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरोडय़ाची ही घटना सातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेपासून काही अंतरावर मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दरोडेखोरांनी प्रथम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण केला. अचानक सिग्नल बंद पडल्याने सह्याद्री एक्स्प्रेस शेणोली स्टेशनजवळ थांबली. याच संधीचा फायदा घेत दरोडेखोरांनी डब्यांमध्ये प्रवेश करून प्रवाशांना दमदाटी करत लुटमार केली. यावेळी महिला प्रवाशांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल फोन हिसकावून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. काही प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांना दम देत गप्प बसण्यास भाग पाडले. दरोडेखोरांनी काही मिनिटांतच आपला डाव साधला आणि अंधाराचा फायदा घेत फरारी झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

लोहमार्ग पोलिसांकडून तपास सुरू

दरोडय़ाची माहिती मिळताच, मिरज लोहमार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे. रेल्वे सिग्नल यंत्रणेत नेमकी कशाप्रकारे छेडछाड करण्यात आली, याचा तांत्रिक तपासही सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांचे जबाब आणि स्थानिकांकडून माहिती गोळा केली जात आहे.