
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात फोडाफोडीच्या चर्चेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. भाजप आपल्याच मित्रपक्षांना दगा देण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला असून, आगामी काळात महायुतीत मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत दिले आहेत.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार आणि खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून, म्हणजेच भाजपकडून, सत्तेतल्या त्यांच्याच मित्रपक्षांची शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.
महाराष्ट्राला काळिमा फासणारे भोंदू खरात प्रकरण हे योगायोगाने समोर आलेले नसून ते जाणीवपूर्वक बाहेर काढले गेले आहे आणि ही तर केवळ सुरुवात आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्किल भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, आज भाजप मित्रपक्षांप्रती जरी ‘ए दोस्ती हम नही छोडेंगे’ ची भावना दाखवत असले तरी उद्या मित्रपक्षांची भावना भाजपाबाबत “जा बेवफा जा हमे…” याहून वेगळी असणार नाही हे नक्की आहे. त्यामुळे आपली शिकार होऊ नये यासाठी मित्रपक्षांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही त्यांनी महायुतीतील घटक पक्षांना दिला आहे.


























































