
कर्नाटकातील काँग्रेस सरकारसमोर आज नवा पेच निर्माण झाला. काँग्रेसचे 30 ज्येष्ठ आमदार मंत्रिपदाच्या मागणीसाठी आज थेट हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने मंत्रिमंडळात तातडीने फेरबदल करावा यासाठी दिल्लीतून दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
मंत्रिमंडळाची पुनर्रचना करून किमान 25 आमदारांचा तरी त्यात समावेश केला जावा, अशी या आमदारांची मागणी आहे. यापूर्वीही मोठय़ा संख्येने एकत्र येऊन मंत्रिमंडळात संधी मिळवण्यासाठी सामूहिकपणे मागणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, असे या 30 आमदारांमध्ये समावेश असलेले आमदार बेलूर गोपालकृष्णन यांनी सांगितले. चार-पाच वेळा मंत्रिपद भोगलेल्या आमदारांना या वेळी पुन्हा सिद्धरामय्या सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. ज्यांना अद्याप संधी मिळालेली नाही त्यांना संधी देण्यात यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही दिल्लीला जात असल्याचे गोपालकृष्णन म्हणाले.
आश्वासन देऊनही सिद्धरामय्यांची टाळाटाळ
सिद्धरामय्या यांनी यापूर्वी इतर आमदारांना दोन वर्षांनंतर मंत्रिमंडळात सामावून घेण्याचे संकेत दिले होते; परंतु निवडणुका आणि विधानसभा अधिवेशनांमुळे जवळपास तीन वर्षे उलटून गेली आहेत. त्यामुळे आता हायकमांडकडे गेल्याशिवाय पर्याय नसून राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, रणजीत सुरजेवाला यांची भेट घेणार असल्याचे आमदार अशोक पट्टन यांनी सांगितले.


























































