
भरधाव पिकअप टेम्पो बैलगाड्यांच्या जथ्थ्यात घुसून एक महिला जागीच ठार तर आठ यात्रेकरू गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील कळमगावाच्या परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. पिकअप टेम्पोचा वेग सुसाट असल्याने अपघाताचे स्वरूप भयानक होते. या दुर्घटनेत दोन बैलांचाही मृत्यू झाला असून चार बैल गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेली महिला आणि यात्रेकरू हे घोटी येथील आहेत. ते वज्रेश्वरी येथील यात्रेसाठी सालाबादप्रमाणे नऊ बैलगाड्यांमधून जात होते.
वज्रेश्वरी येथील यात्रेसाठी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील काही ग्रामस्थ शनिवारी बैलगाडीमधून निघाले होते. नऊ बैलगाड्यांचा जथ्था नाशिक-मुंबई महामार्गावरून मार्गक्रमण करत रात्री एकच्या सुमारास कळमगावच्या परिसरात पोहोचला. त्याचवेळी याच मार्गावरून सुसाट जात असलेला पिकअप टेम्पो बैलगाड्यांच्या जथ्यात घुसला. एकापाठोपाठ एक बैलगाड्यांना या टेम्पोने चिरडले. या अपघातात सुरेखा आडोळे (४७) यांचा जागीच मृत्यू झाला तर वैभव गीते, सचिन आडोळे, फुलचंद आडोळे, शुभम लहाने, देविदास भगत, जनाबाई भगत, वैभव भगत व पिकअप वाहनामधील क्लिनर मांगीलाल असे आठजण गंभीर जखमी झाले. सर्वच जखमींना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पोचा क्लिनर मांगीलाल हा या अपघातात गंभीर जखमी आहे. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत.
- रात्री एकच्या सुमारास पिकअप टेम्पो अचानक बैलगाड्यांच्या जथ्यात घुसल्याने एकच गोंधळ उडाला.
- या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासी मदतीला धावले. पोलीस आणि बचाव पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
- या अपघातात दोन बैल ठार व चार बैल जखमी झाले आहेत. काही बैलगाड्यांचेही मोठे नुकसान झालेले आहे.
- अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे घोटी तालुक्यात एकच पळापळ उडाली. जखमी यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी तातडीने शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.
चालक फरार
मुंबई-नाशिक मार्गावर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्यानंतर पिकअप टेम्पोचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. जखमींना मदत न करताच त्याने पलायन केले. या फरारी चालकाचा शहापूर पोलीस कसून तपास करत आहेत. जखमी झालेल्या सर्वच यात्रेकरूंची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे.



























































