रेल्वे स्टेशनवर किराणा घ्या आणि थेट घरी जा; कसारा, वासिंद स्थानकांवर दुकाने सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वडापाव, सुकी भेळ तसेच चणे, फुटाणे, बिस्किटांची दुकाने सर्वच रेल्वे स्थानकांवर असतात. मात्र आता मध्य रेल्वेच्या कसारा व वासिंद स्थानकांवर चक्क किराणा मालाची दुकाने दिसणार आहेत. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या चाकरमान्यांना स्थानकावर उतरताच हवा तो किराणा विकत घेऊन घर गाठता येणार आहे. रेल्वेच्या या नव्या प्रयोगाचा हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे.

मध्य रेल्वेने कसारा, वासिंद (पूर्व-पश्चिम) आणि मानखुर्द या स्थानकांवर किराणामालाची ही दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉन-फेअर महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाने हा आगळावेगळा प्रयोग हाती घेतला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. रात्री उशिरापर्यंत अनेक जण घरी परतत असतात. या धावपळीत त्यांना घरातील वस्तू दुकाने बंद होत असल्याने विकत घेता येत नाहीत. अशा परिस्थितीत स्थानकावरच किराणा उपलब्ध झाल्यास त्यांना दिलासा मिळणार आहे. १५ एप्रिल रोजी कसारा रेल्वे स्थानकातून – या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या – निर्णयामुळे छोट्या उद्योजकांना व्यवसायाची नवी संधी मिळणार असून भविष्यात रेल्वे स्थानके ‘मिनी कमर्शियल हब’ म्हणून विकसित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुकानांसाठी मध्य रेल्वेकडून

ई-लिलाव प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून इच्छुक व्यावसायिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास इतर स्थानकांवरही किराणा दुकाने सुरू करण्याचा विचार करण्यात येणार आहे. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

प्रवाशांकडून स्वागत

रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. स्थानकावरच खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्यास ‘एकाच वेळी दोन कामे’ पूर्ण करण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे, असे प्रवासी विशाल जाधव व रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले.