नार्सिंग कॉलेजचा 200 कोटींचा भूखंड खासगी विकासकाला देऊ नका! शिवसेनेची सभागृहात मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या मालकीचा भूखंड वांद्रे पश्चिम येथील आर. के. पाटकर मार्गावर आहे. 2336 स्क्वेअर मीटरच्या या भूखंडावर आरोग्य विभागाचे आरक्षण असून या भूखंडावर स्वतःचे नर्सिंग कॉलेज बांधायचे धोरण पालिकेचे होते. परंतु आता हा भूखंड जिंदाल फाउंडेशनला देण्याचे निश्चित करण्यात आले असून बाजारभावाने 200 कोटी किंमत असलेल्या या भूखंडाच्या बदली पालिकेला फक्त 5 करोड 29 लाख रुपये देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी महासभेत अर्थसंकल्पीय भाषणात केला.

या भूखंडाच्या लीज भाडय़ापोटी पालिकेला फक्त वार्षिक 3000 रुपये मिळणार असून सदर प्रकरणात महानगरपालिकेचे प्रचंड नुकसान होणार आहे. सदर ठिकाणी जिंदाल फाउंडेशन खासगी नर्सिंग  कॉलेज बांधणार असून या कॉलेजमध्ये नर्सेससाठी असलेल्या फक्त 40 टक्के जागा मुंबई महापालिकेला देण्यात येणार आहेत. हे धोरण अन्यायकारक असून सदर टेंडर रद्द करून हा भूखंड महानगरपालिकेनेच विकसित करावा व महापालिकेच्या मालकीचे स्वतःचे नर्सिंग कॉलेज बनवून त्या ठिकाणी असणाऱया सर्व सीट्स या महापालिकेला मिळतील आणि त्यातून मुंबई महापालिकेच्या के.ई.एम., सायन, नायर, कूपर या 4 मेडिकल कॉलेज, त्याचप्रमाणे उपनगरीय हॉस्पिटलमधील रिक्त असलेल्या नर्सेसच्या जागा भरल्या जातील, असे पडवळ म्हणाले.