
‘घे भरारी’ ग्रुपच्या वतीने मुंबईत भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. लग्नसराईसाठी खास साडय़ा कॉर्पोरेट साड्या, कपडे, दागिने आणि आकर्षक भेटवस्तूंची स्टॉल या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. व्यावसायिका सायली राजाध्यक्ष यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. दादरच्या कॅटरिंग कॉलेजसमोरील सूर्यवंशी क्षत्रिय सभागृहात 19 एप्रिलपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी खुले राहणार आहे.
‘घे भरारी’ फेसबुक ग्रुपतर्फे याआधी पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पनवेल, सांगली, बंगळुरू, बेळगाव अशा विविध ठिकाणी प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. नव्याने व्यवसाय सुरू करणाऱया उद्योजकांसाठी ‘घे भरारी’ हे हक्काचे व्यासपीठ आहे. या प्रदर्शनात ठाणे, मुंबई, पुणे, इंदूर, कोल्हापूरमधील 120 हून अधिक व्यावसायिक आणि महिलांनी सहभाग घेतला आहे. तसेच खवय्यांसाठी उत्तम व ताजे पॅक फूडस्टॉलदेखील उभारण्यात आले असल्याने नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन समूहाचे संस्थापक राहुल कुलकर्णी व नीलम उमराणी -एदलाबादकर यांनी केले आहे.
समूहातर्फे प्रदर्शनात सजावटीच्या वस्तू, आकर्षक दागिने, विविध प्रकारचे कपडे, परफ्युम, कुर्ती, पर्स, हातमागाच्या वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, हॅण्डमेड सोप्स, हस्तकलेच्या वस्तू, पिशव्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत.
























































