दोन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी आणखी 53 दिवसांचा ब्लॉक, सीएसएमटीचा पुनर्विकास कासवगतीने सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) पुनर्विकास प्रकल्पांतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 16 व 17च्या विस्तारीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणामार्फत हे काम केले जात असून चार महिन्यांत चारवेळा ब्लॉकची मुदत वाढवण्यात आली. यापूर्वी सलग दोनवेळा महिनाभराची मुदतवाढ दिल्यानंतर आता आणखी 53 दिवसांचा ब्लॉक (5 ऑगस्टपर्यंत) जाहीर केला आहे. यात प्रवाशांचे हाल होत आहेत.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम फेब्रुवारीत ब्लॉक घेतला होता. 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिलपर्यंत तीन महिन्यांचा ब्लॉक घेण्यात आला. नंतर त्याची मुदत 19 मेपर्यंत वाढवली. त्यातही काम अर्धवट राहिल्याने ब्लॉकची मुदत आणखी महिनाभरासाठी म्हणजेच 13 जूनपर्यंत वाढवण्यात आली. लागोपाठ दोनदा ब्लॉकला मुदतवाढ देऊनही प्राधिकरणाने दोन प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता 5
ऑगस्टपर्यंत प्लॅटफॉर्म क्र. 16 आणि 17 हे प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईबाहेरून येणाऱया अनेक गाडय़ांचा शेवटचे स्थानक बदलण्यात आले आहे. मडगाव ते सीएसएमटीदरम्यान धावणाऱया तेजस एक्प्रेससह अनेक गाडय़ांचा प्रवास दादर स्थानकात समाप्त केला जाणार आहे. दादर स्थानकात प्रवास समाप्त होणाऱया इतर गाडय़ांमध्ये अमरावतीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, बल्लारशाहछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्स्प्रेस, हावडाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, भुवनेश्वरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस, बिदरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस, लातूरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाडय़ांचा समावेश आहे.