
अर्जदाराला ‘इन्स्टाग्राम बॉयफ्रेंड’ असे संबोधत त्याच्यावर बलात्काराचा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अर्जदाराची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली. खटला पूर्ण होण्यास अजून बराच कालावधी लागेल आणि तरुणाच्या वयाचा व आरोग्याचा विचार करता त्याला आणखी तुरुंगात ठेवणे योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती शाम चांडक यांनी २२ वर्षीय तरुणाचा जामीन मंजूर केला.
डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर बलात्कार, अपहरण आणि विनयभंगासह पॉक्सो व आयटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. या तरुणाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी मैत्री केली होती आणि त्यानंतर ते दोघे मुंबईतून पुण्याला पळून गेले होते. फिर्यादी आणि मुलीच्या आईने आरोपीवर मुलीला पळवून नेल्याचा आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. जामिनासाठी आरोपीने एड. हरेकृष्ण मिश्रा यांच्यामार्फत अर्ज केला. त्या अर्जावर न्यायमूर्ती शाम चांडक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.
प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रेमसंबंधांचे असल्याचे दिसत आहे. मुलीच्या आईने विचारणा केली असता, दोघांनी आत्महत्येची धमकी दिली होती; तसेच गुन्ह्याच्या वेळी संबंधित तरुण १८ वर्षे ९ महिन्यांचा होता. तो गरीब कुटुंबातील असल्याने, वयामुळे त्याला या गुन्ह्याचे गांभीर्य आणि गंभीर परिणाम समजले नसावेत, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने आरोपीची सुटका केली.
























































