Rain Alert – नाशिक जिल्ह्याला पुढील 3 तास महत्त्वाचे; वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक शहर आणि जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला असून, हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात पुढील 3 तासांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसासोबतच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मंगळवारी रात्रीपासूनच नाशिक त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई मंत्रालयातून राज्यातील हवामानाचा आढावा घेण्यात आला असून, नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे,असे स्पष्ट निर्देश मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. तसेच सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नाशिककरांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी सूचनांचे पालन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.