रिव्हर्स घेताना नियंत्रण सुटले; भांडुपमध्ये बेस्टची वाहनांना धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुपच्या कोकणनगर परिसरात बेस्ट बसने पादचाऱ्यांसह वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना उघडकीस आली. आज सकाळी बस रिव्हर्स (मागे) घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बेस्टची ई-बस सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास कोकणपाडा परिसरातील क्रिटिकेअर रुग्णालयाजवळ रिव्हर्स घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव बसने तीन दुचाकी व एका रिक्षासह अतुल पाडळे (६३) या व्यक्तीला जोरदार धडक दिली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य करत जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. सध्या पाडळे यांच्यावर उपचार सुरू असून, या घटनेबाबत पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.