
भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या धडक कारवाईदरम्यान तेलंगणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीचे (HMDA) मुख्य अभियंता बी. रविंदर यांच्यावर उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल करत त्यांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईदरम्यान हाती लागलेल्या घबाडामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार या मालमत्तेची अधिकृत किंमत 9.24 कोटी रुपये आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या मालमत्तेची खरी किंमत तब्बल 100 कोटी रुपये असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एसीबीच्या ‘सिटी रेंज-1’ पथकाने मंगळवारी बी. रविंदर यांचे घर, कार्यालय आणि त्यांच्याशी संबंधित इतर नऊ ठिकाणांवर ही शोधमोहीम राबवली.
तपास यंत्रणेने रविंदर यांच्या नातेवाईकांसह त्यांचे निकटवर्तीय आणि गुंतवणूकदारांच्या मालमत्तांवरही गदा आणली आहे. या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर जंगम आणि स्थावर मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये हैदराबाद परिसरातील कोंडाकल व किस्मतपूर येथील 5 मोकळे भूखंड, नरसिंगी आणि नानकरामगुडा येथील 4 आलिशान फ्लॅट्स, शमशाबाद परिसरातील 4 एकर शेतजमीन, मोकिला येथील एक सेमी-फिनिश्ड व्हिला आणि कोंडापूर भागातील एका व्यावसायिक इमारतीचा समावेश आहे.
स्थावर मालमत्तेसोबतच या कारवाईत कोट्यवधींचे रोख आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी रविंदर यांच्या घरातून 3.82 लाख रुपयांची रोकड, 45 लाख रुपयांच्या बँक ठेवी, 1 किलो 440 ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेबारा किलो चांदी आणि सुमारे 17.24 लाख रुपयांचे घरगुती सामान जप्त केले आहे. सरकारी दस्तऐवजातील किंमत आणि प्रत्यक्ष बाजारभाव यांतील प्रचंड फरकामुळे कागदोपत्री 9 कोटी दिसणारी ही संपत्ती प्रत्यक्षात 100 कोटींची निघाली आहे. सध्या या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आयएसटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



























































