मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवा मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी भाषा, साहित्य आणि बोलींच्या जतन तसेच संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकांचे वेळापत्रक निश्चित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी, संस्थेचा गेल्या काही वर्षांचा प्रशासकीय आणि वैधानिक अनुशेष पूर्ण झाल्याने संस्थेची प्रशासकीय रचना अधिक सक्षम झाली आहे, असे सांगितले. त्यामुळे आता मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धन यासाठी ठोस धोरणे राबविण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मकतेने सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आजच्या बैठकीत सदस्यांनी मराठी भाषा आणि विविध बोलींच्या संवर्धनासाठी अनेक सूचना मांडल्या. ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ उपक्रमांचा विस्तार करून आदिवासी आणि सीमावर्ती भागातील मराठी शाळांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचविणे, झाडीबोली आणि पूर्व विदर्भातील नाट्यपरंपरेच्या जतनासाठी गडचिरोली-वडसा परिसरात नाट्यसंकुल उभारणे, लोककलांच्या माध्यमातून मराठीचा वारसा जपणे तसेच बालसाहित्य आणि बालग्रंथालयांना प्रोत्साहन देण्याबाबत सूचना मांडल्या गेल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मकतेने विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी ७५ आंतरराष्ट्रीय बृहन्महाराष्ट्र मंच उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.