
मुंबई विद्यापीठ आता रोजगाराचे शिक्षण देणारी तब्बल १२ नवीन कौशल्य महाविद्यालये सुरू करणार आहे. यामुळे शेकडो जागा वाढणार असून शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाबाबत शैक्षणिक वर्ष २०२७-२८ च्या बृहत् आराखड्याला आज विद्यापीठाच्या सिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमधील प्रवेशसंख्येत घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक शिक्षणावर भर न देता उद्योगविश्वाच्या अपेक्षा पूर्ण करणारे, कौशल्यविकासाला चालना देणारे आणि रोजगारक्षमतेत वाढ करणारे अभ्यासक्रम विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच उद्योग, सेवा, संशोधन आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होतील. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील मुंबईत दादर पश्चिम, मालाड पश्चिम, मुलुंड पूर्व, कांदिवली पूर्व; ठाणे जिल्ह्यात मुरबाड-सरळगाव; रायगड जिल्ह्यात रोहा; रत्नागिरी जिल्ह्यात चाफे, दापोली शहर; सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड आणि पालघर जिल्ह्यात लालोंडे व वसई-कामण येथे ही महाविद्यालये प्रस्तावित आहेत.





























































