
आयआयटी कानपुरच्या बी. टेक सारयबर सुरक्षा अभ्यासक्रमात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी संबंधीत फॉर्म भरले आहेत. मात्र काही विद्यार्थ्यांना या नविन अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला नाही. याच रागतून एका विद्यार्थ्यांने संस्थेची अधिकृत वेबसाइट हॅक केल्याची घटना समोर आली आहे. प्रवेश प्रक्रियेत शॉर्टलिस्ट न झाल्यामुळे या विद्यार्थ्याने हे पाऊल उचलले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर विद्यार्थ्याने रेडिट अॅपवर शेअर केलेल्या माहितीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. वेबसाइट हॅक केल्यानंतर या विद्यार्थ्याने त्यावर मला फक्त एक योग्य संधी हवी आहे (All I Need is Just a Fair Chance) एक मेसेज टाकला होता. या प्रकारानंतर आयआयटी कानपूर प्रशासनाने विद्यार्थ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा एफआयआर (FIR) दाखल न करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून संस्थेने मोठा निर्णय घेत विद्यार्थ्यांला समज दिली आहे.
संस्थेचे संचालक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितले की, विद्यार्थ्याची तांत्रिक कौशल्ये तपासण्यासाठी लवकरच एक विशेष परीक्षा घेतली जाईल. जर हा विद्यार्थी त्या परीक्षेत पास झाला, तर त्याला पुढल्या वेळी प्रवेशप्रक्रियेत संधी देण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मनिंद्र अग्रवाल म्हणाले.
याव्यतिरिक्त, कोणत्याही अभ्यासक्रमात अॅडमिशनची संधी मिळवण्यासाठी अशा युक्त्यांचा अवलंब करणे योग्य नाही. सायबरसुरक्षेमध्ये कौशल्य असलेल्यांनी त्यांचे सीव्ही (CV) आमच्यासोबत शेअर करावेत. यानुसार आम्ही C3iHub मधील इंटर्नशिप किंवा नोकरीसाठी त्यांचा विचार करू. विद्यार्थ्यांनी आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी नेहमी योग्य आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले पाहिजे आणि गंभीर परिणाम होऊ शकतील अशा कृतींमध्ये सहभागी होणे टाळायला हवे, असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
























































