
मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अजरामर आहेत. या यादीत ज्येष्ठ दिग्दर्शिका, नाट्यगुरू आणि मराठी रंगभूमीला आधुनिक विचारांची नवी दिशा देणाऱ्या विजया मेहता यांचे स्थान खूप वरचे/उंच आहे. आपल्या प्रयोगशील दिग्दर्शनाने, कलाकार घडविण्याच्या विलक्षण हातोटीने आणि नाट्यकलेविषयीच्या सखोल चिंतनाने त्यांनी मराठी रंगभूमीला जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळवून दिली. अभिनय, दिग्दर्शन आणि नाट्यप्रशिक्षण या तिन्ही क्षेत्रांत विजयाबाईंनी दिलेले योगदान मराठी रंगभूमीसाठी अमूल्य मानले जाते. त्यांच्या नाटकांनी अनेक पिढ्यांच्या कलाकारांना घडवले, तर त्यांच्या विचारांनी रंगभूमीला नवी अभिव्यक्ती दिली. अशा या समस्त रंगकर्मींच्या लाडक्या ‘बाई’ यांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या पु.ल. कट्ट्यावर आयोजित करण्यात आला आहे. अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील बहुविध दालनात होणाऱ्या या कार्यक्रमात विजयाबाईंनी लिहिलेल्या निवडक आठवणी, त्यांच्याविषयीच्या दिग्गजांच्या मुलाखती आणि लेखांचे अभिवाचन शुभांगी भुजबळ, अक्षय शिंपी आणि पल्लवी वाघ-केळकर करणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी प्रतिमा कुलकर्णी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असून त्या विजयाबाईंच्या सहवासातील स्मृतींना उजाळा देणार आहेत. मराठी रंगभूमीच्या एका सुवर्णपर्वाचा मागोवा घेण्याची ही संधी रसिकांनी दवडू नये, असे आवाहन अकादमीतर्फे करण्यात आले आहे.































































