पंतप्रधानांचे ‘मैं उडता ही फिरू’ धोरण; मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 6 वर्षांत 557 कोटी खर्च, केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा परदेश दौऱ्यावर जात असतात. त्यांच्या परदेश दौऱ्यांची विविध कारणांनी चर्चा होते; मात्र गेल्या सहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर तब्बल ५५७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. यासंदर्भात सरकारनेच राज्यसभेत माहिती दिली आहे.

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि माकपचे खासदार व्ही. शिवदासन यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाबाबत राज्यसभेत प्रश्न विचारला होता. परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गारेटा यांनी त्याचे लेखी उत्तर दिले. त्यानुसार, वर्ष २०२१ ते जुलै २०२६ पर्यंत एकूण ५५७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या खर्चात परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठका, हिंदुस्तानी समुदायासोबतचा संवाद, आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांमधील सहभाग आदींचा समावेश आहे. वर्ष २०२१ मध्ये ३६ कोटी, २०२२ मध्ये ५५.८२ कोटी, २०२३ मध्ये ९३ कोटी, २०२४ मध्ये १०९ कोटी आणि २०२५ मध्ये १८७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यापैकी सर्वाधिक २५.५९ कोटी रुपये गेल्या वर्षी फ्रान्स दौऱ्यावर खर्च झाले. एप्रिल २०२१ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मोदी सरकारने विविध करार केले. त्यातून ३८१.८ अब्ज डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक भारतात आल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे.

या वर्षी १३ देशांचा दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी युएई, नॉर्वे, इस्रायल, इटली, स्वीडन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी १३ देशांना भेटी दिल्या. त्यात ७५ कोटी रुपये खर्च झाले. सर्वाधिक १७.४६ कोटी रुपयांचा खर्च मे महिन्यातील नॉर्वे दौऱ्यात झाला, तर फेब्रुवारी महिन्यातील इस्रायल दौऱ्यात १९.१२ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती सरकारने दिली.

२०२५ मध्ये सर्वाधिक खर्च

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी एकूण १८० कोटी रुपये खर्च झाले. त्यात फ्रान्स दौऱ्यात २५.५९ कोटी, अमेरिका दौऱ्यात १६.५४ कोटी, सौदी अरेबिया दौऱ्यात १५.५४ कोटी, ब्राझीलमध्ये १७.७२ कोटी, चीनमध्ये १०.५९ कोटी आणि अमेरिकेत ९.९१ कोटी रुपये खर्च झाले.