
दादरमधील वाचन चळवळीचे एक प्रमुख केंद्र असलेल्या प्रसिद्ध ‘वसंत वाचनालया’चे संस्थापक व संचालक वसंत शिवराम सावरकर यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. वसंतरावांच्या निधनाने एक सच्चा वाचनसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन वसंतरावांनी १७ जुलै १९५८ रोजी दादर येथील शिवाजी पार्क नाक्यावर वाचनालय सुरू केले. दोन कपाटांत काही पुस्तके ठेवून सुरू झालेले हे वाचनालय कालांतराने दादर व आसपासच्या परिसरातील वाचकांचे हक्काचे ठिकाण बनले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी गेली ६८ वर्षे हे वाचनालय अविरत सुरू ठेवले.
वाचकांच्या आवडीनिवडी आणि बदलत्या काळानुसार त्यांनी वाचनालयात आवश्यक बदल केले. वाचकांना हवे असलेले पुस्तक मिळवून देण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत असत. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
वाचनालय सुरूच राहणार! “वसंत वाचनालय यापुढेही सुरूच राहील,” असे वसंतरावांचे सुपुत्र श्रीराम सावरकर यांनी सांगितले. “बाबांचे पुस्तकांवर आणि वाचनावर नितांत प्रेम होते. त्यांची वाचनसेवा या वाचनालयाच्या माध्यमातून यापुढेही सुरूच राहील, त्यात खंड पडणार नाही,” असे श्रीराम सावरकर म्हणाले.



























































